India vs Sri Lanka: भारत-श्रीलंका यांच्यातली मर्यादित षटकांची मालिका होणार की नाही, याबाबत संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. इंग्लंड दौऱ्यावरून मायदेशी परतलेल्या श्रीलंकचे खेळाडू व सपोर्ट स्टाफमधील सदस्य विलगिकरणात आहेत. त्यात संघाचे फलंदाजी प्रशिक्षक ग्रँड फ्लॉवर आणि डाटा विश्लेषक जीटी निरोशन यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. त्यामुळे १३ जुलैपासून सुरू होणारी मालिका १८ जुलैपासून सुरू होणार असल्याची घोषणा बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी दिली आहे. त्यात श्रीलंका क्रिकेट बोर्डानं प्लान बी म्हणून पर्यायी खेळाडूंचा चमू तयार ठेवला होता. पण, आता या संघातील एक खेळाडू कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे वृत्त समोर येत आहे. त्यामुळे ही मालिका होणार की नाही, याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे. ( one player from Sri Lanka's alternate team for the series against India has tested positive for the virus)
संदून वीराक्कोडी ( Sandun Weerakkody) असे या खेळाडूचे नाव आहे आणि मागील दहा दिवसांपासून बायो बबलमध्ये असलेल्या पर्यायी खेळाडूंच्या चमूसोबत तो सराव सत्रात सहभागी झाला होता. त्याला आता हॉटेलमध्ये विलगिकरणात ठेवण्यात आले आहे. Cricwire Sri Lanka नं दिलेल्या माहितीनुसार वीराक्कोडी हा डाम्बुला येथे काही सराव सामने खेळण्यासाठी आला होता. त्याच्यासोबत भानुका राजपक्षा व अन्य काही खेळाडूही होते. भारतीय संघ सध्या ताज समुद्रा या हॉटेलमध्ये आहे आणि तेथून १.५ किलोमीटर अंतरावरील चिनामोन ग्रँड हॉटेलमध्ये श्रीलंकेचा पर्यायी संघ आहे. त्यातला खेळाडू कोरोना पॉझिटिव्ह आढळल्यामुळे असेला गुणरत्ने, अँडेलो परेरा आणि भानुका यांनाही विलगिकरणात रहावे लागणार आहे.
IND vs SL : धक्कादायक; कोरोना पॉझिटिव्ह झालेल्या ग्रँड फ्लॉवर यांनी लस घेण्यास दिला होता नकार!
श्रीलंका क्रिकेट बोर्डानं पर्यायी संघाव्यतिरिक्त दुसरा गटही तयार ठेवला आहे आणि त्यापैकी एकाचाही कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आलेला नाही. त्यामुळे या गटातील खेळाडू भारताविरुद्धच्या मालिकेत खेळू शकतील. सुधारित वेळापत्रकानुसार या मालिकेला १३ ऐवजी १८ जुलैपासून सुरूवात होणार आहे. २० व २३ जुलैला दुसरा व तिसरा वन डे सामना होईल, तर २५ , २७ व २९ जुलैला ट्वेंटी-२० मालिकेतील सामने खेळवण्यात येतील.