नागपूर- मुरली विजय (128), चेतेश्वर पुजारा (नाबाद 121) आणि कॅप्टन कोहलीच्या हाफ सेंच्युरीच्या जोरावर टीम इंडियाने नागपूर टेस्टच्या दुसऱ्या दिवशी आपली पकड मजबूत केली आहे. टीम इंडियानं पहिल्या डावात 2 बाद 312 धावांची मजल मारत श्रीलंकेवर 107 धावांची भक्कम आघाडी घेतली आहे. मुरली विजयनं कसोटी कारकीर्दीतलं दहावं शतक साजरं केलं. त्यानं 221 चेंडूंत 128 धावांची खेळी केली. विजयने शतकी खेळीत अकरा चौकार आणि एक षटकार लगावला. त्याचबरोबर पुजारानंही 284 चेंडूंत तेरा चौकारांसह नाबाद 121 धावांची खेळी उभारली.
पुजाराचं कारकीर्दीतलं हे 14 वं कसोटी शतक ठरलं. या दोघांनी मिळून दुसऱ्या विकेटसाठी 209 धावांची महत्वपूर्ण भागिदारी रचली. त्यानंतर आलेल्या कॅप्टन विराट कोहलीनंही नाबाद अर्धशतक झळकावताना टीम इंडियाला 300 धावंचा टप्पा ओलांडून दिला. दुसऱ्या दिवशीचा खेळ थांबला तेव्हा पुजारा 121 तर कर्णधार कोहली 54 धावांवर खेळत होते.
गेल्या सहा टेस्ट मॅचमध्ये पुजारा आणि मुरली विजयमध्ये झालेली ही पाचवी शतकीय भागीदारी आहे. मुरली विजय आठ महिन्यांनंतर टेस्ट क्रिकेटमध्ये परतला आहे. टेस्टमध्ये परतण्याबरोबरच त्याने शानदार शतकही लगावला.
दरम्यान, काल भारतीय गोलंदाजांनी श्रीलंकेचा पहिला डाव अवघ्या 205 धावांत गुंडाळला. त्यानंतर पहिला डाव सुरू करण्यासाठी मैदानात उतरलेल्या टीम इंडियाने दिवसाचा खेळ संपेपर्यंत 11 धावा केल्या. सलामीवीर लोकेश राहुलचा अपवाद वगळता पहिला दिवस भारतासाठी अनुकूल ठरला. लोकेश राहुल (7) धावांवर स्वस्तात बाद झाला. नागपूर व्हीसीए जामठाच्या खेळपट्टीवर दुसरा कसोटी सामना सुरु आहे. हिरवळ असल्यामुळे वेगवान गोलंदाजांना अनुकूल ठरण्याची शक्यता वर्तविण्यात येत असताना खेळपट्टीने आपला मूळ स्वभाव कायम ठेवत फिरकीपटूंना अधिक झुकते माप दिले.
फिरकीपटू रविचंद्रन आश्विन (४-६७) व रवींद्र जडेजा (३-५६) आणि वेगवान गोलंदाज ईशांत शर्मा (३-३७) यांच्या अचूक मा-याच्या जोरावर भारताने श्रीलंकेचा पहिला डाव २०५ धावांत गुंडाळला. श्रीलंकेतर्फे करुणारत्ने (५१)व चांदीमल (५७) यांनी वैयक्तिक अर्धशतके झळकावली, पण त्यांना अन्य सहका-यांकडून अपेक्षित साथ लाभली नाही.
यजमान भारताने पहिल्या कसोटी सामन्यात खेळविलेल्या संघात तीन बदल केले. मुरली विजय, रोहित शर्मा व ईशांत शर्मा यांना अनुक्रमे शिखर धवन, भुवनेश्वर कुमार व मोहम्मद शमी यांच्या स्थानी अंतिम संघात संधी दिली. मोहम्मद शमीला दुखापत झाल्याचे विराटने सामन्यापूर्वी स्पष्ट केले. पाच गोलंदाजांना संधी देण्याच्या निर्णयाचे समर्थन करणा-या विराटने यावेळी मात्र सात फलंदाजांसह खेळण्याचा निर्णय घेतला, हे विशेष.