मुंबई : भारत विरुद्ध वेस्ट इंडिज यांच्यातील तिसरा निर्णायक सामना वानखेडे मैदानावर होणार आहे. वानखेडेवर वेस्ट इंडिजला धक्का देण्यासाठी मुंबईचे त्रिकुट सज्ज असल्याचे दिसत आहे.
हा सामना दोन्ही संघांसाठी महत्वाचा आहे. कारण हा सामना जो संघ जिंकेल, त्यांना मालिका विजय मिळवता येणार आहे. या मालिकेतील पहिल्या सामन्यात भारताने विजय मिळवला होता. पण दुसऱ्या सामन्यात वेस्ट इंडिजने भारतावर बाजी मारली आणि मालिका १-१ अशी बरोबरी आली. त्यामुळे हा तिसरा सामना दोन्ही संघांसाठी महत्वाचा ठरणार आहे.
घरच्या मैदानात खेळाडूंची कामगिरी चागंली होते, असे म्हटले जाते. कारण त्यांना चाहत्यांचा चांगला पाठिंबा मिळत असतो. या सामन्यात वानखेडेवर भारताकडून तीन खेळाडू उतरतील, असे म्हटले जात आहे.
भारताचा सलामीवीर रोहित शर्माला अजूनही या मालिकेत सूर गवसलेला दिसत नाही. कारण या मालिकेत रोहितला एकही मोठी खेळी साकारता आलेली नाही. त्यामुळे घरच्या मैदानात रोहित कशी कामगिरी करतो, यावर सर्वांचे लक्ष असेल. वेस्ट इंडिजविरुद्धच्या दुसऱ्या सामन्यात मुंबईकर शिवम दुबेने धडाकेबाज अर्धशतक झळकावले होते. त्यामुळे आता घरच्या मैदानात तो पुन्हा एकदा तळपणार का, याची उत्सुकता मुंबईकरांना असेल. रोहित आणि शिवम यांच्याबरोबर श्रेयस अय्यरही या सामन्यात खेळण्याची शक्यता आले. त्यामुळे वेस्ट इंडिजला धक्का देण्यासाठी मुंबईचे त्रिकुट सज्ज असल्याचे म्हटले जात आहे.