मुंबई : रोहित शर्मा आणि लोकेश राहुल या दोन्ही सलामीवीरांनी वानखेडेवरच्या तिसऱ्या ट्वेन्टी-२० सामन्यात वेस्ट इंडिजच्या गोलंदाजांचा चांगलाच समाचार घेतला. या दोघांच्या दणदणीत खेळींच्या जोरावर भारताला वेस्ट इंडिजपुढे 241 धावांचे आव्हान ठेवता आले. लोकेश राहुलने यावेळी ५६ चेंडूंत ९ चौकार आणि चार षटकारांच्या जोरावर ९१ धावांची खेळी साकारली. रोहितने त्याला ७१ धावांची झंझावाती खेळा साकारून चांगली साथ दिली, तर कोहलीनेही यावेळी धडाकेबाज अर्धशतक पूर्ण केले.
वेस्ट इंडिजने नाणेफेक जिंकत या सामन्यात भारताला प्रथम फलंदाजीसाठी पाचारण केले. या सामन्यात रोहित शर्मा आणि लोकेश राहुल यांनी भारताला दणकेबाज सुरुवात करून दिली. या दोघांच्या फटकेबाजीच्या जोरावर भारताने पाचव्या षटकात आपले अर्धशतक पूर्ण केले.
रोहितने यावेळी षटकार लगावत आपले अर्धशतक पूर्ण केले. अर्धशतकानंतरही रोहित आक्रमक फटकेबाजी करत होता. दुसरीकडे राहुलही गोलंदाजीवर तुटून पडत होता. रोहितनंतर राहुलनेही आपले अर्धशतक पूर्ण केले. त्यानंतर एक मोठा फटका मारण्याच्या नादात रोहित बाद झाला. रोहितने ३४ चेंडूंत सहा चौकार आणि पाच षटकारांच्या जोरावर नाबाद ७१ धावांची धडाकेबाज खेळी साकारली.
रोहित बाद झाल्यावर रिषभ पंत फलंदाजीसाठी आला. पण पंतला यावेळी भोपळाही फोडता आला नाही. पंतनंतर फलंदाजीला आलेल्या कर्णधार विराट कोहलीनेही आक्रमक पवित्रा सुरुवातीपासून ठेवला. या दोघांनीही वेस्ट इंडिजच्या गोलंदाजीवर प्रहार करत भारताला आव्हानात्मक धावसंख्या उभारून देण्यात मोलाचा वाटा उचलला.