नवी दिल्ली, भारत विरुद्ध पाकिस्तान : पाकिस्तानबरोबर आम्ही केंद्र सरकारच्या परवानगीनंतरच खेळू शकतो, असे बीसीसीआयने स्पष्ट केले आहे. पण पीसीबीला मात्र भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये सामने खेळवायचे आहेत. आता तर पीसीबीच्या एका अधिकाऱ्याने, भारताला पाकिस्तानबरोबर खेळावेच लागेल असे वक्तव्य केल्याने क्रिकेट जगतामध्ये खळबळ उडाली आहे.
भारत आणि पाकिस्तान या शेजाऱ्यांमधील राजकीय संबंध सुधारण्याची चिन्हे नाहीच, त्यामुळे उभय देशांमध्ये गेली कित्तेक वर्ष क्रिकेट मालिका झालेल्या नाही. पाकिस्तानविरुद्ध न खेळून भारतीय संघाला आतापर्यंत फार आर्थिक फटका बसलेला नाही, परंतु यापुढे तसे केल्यास भारतीय संघाला वर्ल्ड कप स्पर्धेला मुकावे लागण्याची चिन्हे आहेत.
भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये २००७ सालापासून एकही मालिका खेळवण्यात आलेली नाही. यापूर्वी बीसीसीआय आणि पीसीबी या दोन्ही क्रिकेट मंडळांमध्ये मालिका खेळवण्याचा करार झाला होता. पण भारतामध्ये झालेल्या हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवरून बीसीसीआयने पाकिस्तानशी खेळण्यास नकार दिला होता. दोन्ही देशांमध्ये तणावपूर्ण वातावरण असल्यामुळे भारत सरकारने पाकिस्तानबरोबर खेळण्यास परवानगी नाकारली आहे.
या साऱ्या प्रकाराबाबत पीसीबीचे महा व्यवस्थापक वसिम खान यांनी एक वक्तव्य केले आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार भारताला पाकिस्तानशी खेळावेच लागणार आहे. दुसरीकडे आयसीसी महिला वर्ल्ड चॅम्पियन्सशीप स्पर्धेत भारतीय संघाने पाकिस्तानविरुद्ध खेळण्यास नकार दिला आहे आणि त्याचा फटका त्यांना 2021 च्या वर्ल्ड कप स्पर्धेत बसू शकतो. भारतीय महिला संघाला वर्ल्ड कपमध्ये थेट पात्रता मिळवणे अवघड होऊ शकते.
वसिम खान या साऱ्या प्रकाराबाबत म्हणाले की, " भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामने क्रिकेट विश्वामध्ये उत्सुकतेने पाहिले जातात. हे दोन्ही देश आयसीसीच्या स्पर्धेमध्ये एकमेकांसमोर उभे ठाकले जातात. पण या दोन्ही देशांमध्ये २००७ सालापासून एकही मालिका खेळवली गेलेली नाही. या गोष्टीचा विचार पाकिस्तानच्या खेळाडूंनीही करायला हवा. त्यांनी दमदार कामगिरी करत पाकिस्तानला अव्वल स्थानावर पोहोचवले, तर भारता पाकिस्तानबरोबर खेळावेच लागेल. त्यासाठी पाकिस्तानच्या खेळाडूंनी आपल्या कामगिरीत अधिक सुधारणा करून अव्वल स्थान गाठायला हवे."