मोहाली : पहिल्या वन-डेमध्ये लाजिरवाणा पराभव स्वीकारणारा भारतीय संघ मालिकेतील आव्हान कायम राखण्यासाठी ‘करा अथवा मरा’ अशी परिस्थिती असलेल्या लढतीत आज श्रीलंकेविरुद्ध हिशेब चुकता करण्याच्या निर्धाराने उतरणार आहे.
धर्मशालामध्ये पत्करावा लागलेला पराभव भारतीय संघासाठी धोक्याचा इशारा देणारा आहे. कारण यंदाच्या मोसमात भारताने मायदेशात वर्चस्व गाजवले आहे. ईडनगार्डनवर कसोटी सामन्यात पहिल्या दिवशी श्रीलंकेच्या वेगवान गोलंदाजांपुढे गुडघे टेकविणाºया भारतीय फलंदाजांचा पुन्हा एकदा उसळी घेणा-या खेळपट्टीवर कमकुवतपणा उघड झाला आहे.
चंदीगडमध्ये धर्मशालाप्रमाणे थंडी राहणार नाही, पण तरी वेगवान गोलंदाजांची भूमिका महत्त्वाची ठरेल. कारण सामना ११.३० वाजता सुरू होईल. यजमान संघाला पुन्हा प्रथम फलंदाजी करावी लागली तर ते आव्हान ठरेल. अनुभवी महेंद्रसिंह धोनीचा अपवाद वगळता एकाही भारतीय फलंदाजाला गेल्या लढतीत सुरंगा लकमलला यशस्वीपणे तोंड देता आले नाही. रोहित शर्मा व शिखर धवन झटपट बाद झाल्यानंतर श्रेयस अय्यर, दिनेश कार्तिक व मनीष पांडे यांच्याकडे मोठी खेळी करण्याची चांगली संधी होती, पण एकालाही त्या संधीचे सोने करता आले नाही. धोनीने ६५ धावांची खेळी केल्यामुळे भारताला नीचांकी धावसंख्येची नामुष्की टाळता आली.या कामगिरीमुळे भारतीय कर्णधार विराट कोहली नक्कीच निराश झाला असेल. या मालिकेतून ब्रेक घेणारा विराट इटलीमध्ये अभिनेत्री अनुष्का शर्मासोबत विवाहबंधनात अडकला.
सात गडी राखून पराभव स्वीकारावा लागल्यानंतर रोहित म्हणाला, ‘या परिस्थितीत पुनरागमन करणे महत्त्वाचे आहे. आमच्यासाठी हा धोक्याचा इशारा आहे.’
भारताच्या अंतिम ११ खेळाडूंमध्ये बदल होण्याची शक्यता धूसर आहे, पण अनुभव नसलेल्या मधल्या फळीमध्ये अजिंक्य रहाणेला खेळविण्याची शक्यता नाकारता येत नाही. रहाणे पहिल्या लढतीत संघाबाहेर होता. कारण रोहित व धवन यांनी डावाची सुरुवात केली होती. रहाणेने काही लढतींमध्ये मधल्या फळीतही फलंदाजी केलेली आहे. त्यामुळे त्याला संधी मिळू शकते.
गोलंदाजीमध्ये हार्दिक पांड्याचा खराब फॉर्म संघासाठी चिंतेचा विषय आहे. त्याने बºयाच धावा बहाल केल्या. भारताने केवळ ११२ धावा केल्या होत्या. दक्षिण आफ्रिका दौºयासाठी गोलंदाजी अष्टपैलू म्हणून निवडल्या गेलेल्या पांड्याला पुढील महिन्यात होणाºया दौºयापूर्वी कामगिरीत सुधारणा करावी लागेल. श्रीलंकेने २०.४ षटकांत विजय साकारला. त्यामुळे यजुवेंद्र चहल व कुलदीप यादव यांना गोलंदाजीची संधी मिळाली नाही.
दुसºया बाजूचा विचार करता श्रीलंकेकडे गेल्या वर्षभरापासून सुरू असलेल्या पराभवाचे दुष्टचक्र भेदण्याची ही चांगली संधी आहे. गेल्या महिन्यात न्यूझीलंडही इतिहास रचण्याच्या उंबरठ्यावर होता, पण भारताने त्यानंतर दोन्ही सामने जिंकत मालिका विजय साकारला होता. श्रीलंकेसाठी लकमल ट्रंपकार्ड ठरला, तर अँजेलो मॅथ्यूजनेही शानदार पुनरागमन केले. वेगवान गोलंदाज नुवान प्रदीपही छाप सोडण्यात यशस्वी ठरला. (वृत्तसंस्था)
पहिल्या लढतीप्रमाणे खेळलो तर मालिका जिंकू : परेरा
श्रीलंकेने धर्मशाला येथील लढतीप्रमाणे दुसºया लढतीतही कामगिरी केली तर पाहुणा संघ भारतात प्रथमच मालिका जिंकेल, अशी आशा कर्णधार
थिसारा परेराने व्यक्त केली. तीन वन-डे सामन्यांच्या मालिकेतील दुसºया लढतीच्या पूर्वसंध्येला पत्रकार परिषदेत बोलताना परेरा म्हणाला, ‘येथे मालिका जिंकण्याची चांगली संधी आहे. अनेक संघांना भारतात मालिका जिंकता आलेली नाही. आम्ही काही विशेष करण्यास उत्सुक आहोत.’
सलग १२ पराभवांची मालिका खंडित करण्यात धर्मशाला येथे यश मिळाल्यामुळे श्रीलंका संघाचा आत्मविश्वास उंचावलेला आहे, पण भारतीय संघ पुनरागमन करण्याची शक्यता आहे. भारताने न्यूझीलंडविरुद्ध पहिली लढत गमावल्यानंतर उर्वरित
दोन सामने जिंकत मालिकेत विजय मिळवला होता.
कामगिरीवर विश्वास असल्यामुळे संघात स्थान मिळाले : सुंदर
आपल्या कामगिरीवर विश्वास होता त्यामुळेच भारतीय संघात स्थान मिळवण्यात मदत झाली, अशी प्रतिक्रिया १८ व्या वर्षी टीम इंडियात स्थान मिळालेल्या वॉशिंग्टन सुंदरने व्यक्त केली. सुंदर काही दिवसांपूर्वी यो-यो चाचणीत अपयशी ठरला होता. राष्ट्रीय संघात स्थान मिळवण्यासाठी ही महत्त्वाची चाचणी मानल्या जाते.
सुंदर म्हणाला, ‘कुठल्याही क्रिकेटपटूचे भारतीय संघाचे प्रतिनिधित्व करण्याचे स्वप्न असते. १८ व्या वर्षी भारतीय संघात संधी मिळाली, ही माझ्यासाठी आनंदाची बाब आहे. मला माझ्या कामगिरीवर विश्वास असून मला त्याचा लाभ झाला.’ सुंदरची सर्वप्रथम श्रीलंकेविरुद्धच्या आगामी टी-२० मालिकेसाठी भारतीय संघात निवड झाली होती; पण त्यानंतर दुखापतग्रस्त केदार जाधवच्या स्थानी त्याला अखेरच्या क्षणी पर्याय म्हणून वन-डे संघात स्थान मिळाले.
- कोहलीच्या अनुपस्थितीत कर्णधारपदाची जबाबदारी सांभाळणाºया रोहितने संघाने धर्मशाला लढतीत पत्कराव्या लागलेल्या पराभवातून बोध घेतल्याचे सांगत उर्वरित दोन लढतींत पुनरागमन करणार असल्याचे म्हटले आहे.
प्रतिस्पर्धी संघ
- भारत : रोहित शर्मा (कर्णधार), शिखर धवन, अजिंक्य रहाणे, श्रेयस अय्यर, मनीष पांडे, वाशिंग्टन सुंदर, दिनेश कार्तिक, एम. एस. धोनी, हार्दिक पांड्या, अक्षर पटेल, कुलदीप यादव, यजुवेंद्र चहल, जसप्रीत बुमराह, भुवनेश्वर कुमार, सिद्धार्थ कौल.
- श्रीलंका : थिसारा परेरा (कर्णधार), उपुल थरंगा, धुनष्का गुणतिलका, लाहिरू थिरीमन्ने, अँजेलो मॅथ्यूज, असेला गुणरत्ने, निरोशन डिकवेला, चतुरंगा डीसिल्व्हा, अकिला धनंजया, सुरंगा लकमल, नुवान प्रदीप, सदीरा समरविक्रमा, धनंजय डीसिल्व्हा, दुष्मंता चामीरा, सचित पथिराना, कुशल परेरा.
सामन्याची वेळ : सकाळी ११.३० पासून.
स्थळ : पीसीए स्टेडियम, मोहाली
Web Title: India will try hard to win, today's second match against Sri Lanka
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.