नवी दिल्ली - भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील चौथ्या एकदिवसीय सामन्यात भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे टीम इंडियाचे शिलेदार प्रथम धावपट्टीवर उतरणार आहेत. या सामन्यासह मालिका जिंकण्याचा विराट प्लॅन टीम इंडियाचा असणार आहे. मोहाली येथील पंजाब क्रिकेट असोसिएशनच्या मैदानावर आजचा सामना रंगत आहे.
ऑस्ट्रेलियाविरुद्ध दोन सामन्यात युवा यष्टिरक्षक ऋषभ पंत याला विश्वचषकाच्या दृष्टीने तयार करण्यासाठी अनुभवी महेंद्रसिंग धोनी याला विश्रांती देण्यात आली. त्यामुळे ऋषभची पहिली परीक्षा रविवारी चौथ्या एकदिवसीय सामन्याच्या निमित्ताने असेल. येथे तो कशी कामगिरी करतो, यावर विश्वचषकाची त्याची दावेदारी विसंबून असेल. कर्णधार विराट कोहली विश्वचषक संघाच्या सर्वच संभाव्य खेळाडूंना संधी देऊ इच्छितो. याच कारणास्तव संघ व्यवस्थापन ऋषभची परीक्षा घेणारआहे. धोनीला विश्रांती दिल्यामुळे ऋषभला फलंदाजी आणि यष्टिरक्षण या दोन्ही आघाड्यांवर सरस ठरावे लागेल. याशिवाय मोहम्मद शमीच्या जागी भुवनेश्वर कुमार याला संधी दिली जाईल. शमीला तिसऱ्या सामन्यादरम्यान पायाला दुखापत झाली होती.
फलंदाजीत विराटशिवाय कुणीही फलंदाज धावा काढण्यात यशस्वी ठरलेला नाही. कोहलीपाठोपाठ धावा काढण्यात केदार जाधवला थोडेफार यश आले. रोहित आणि रायुडू यांच्याकडून अपेक्षापूर्ती मात्र झालेली नाही. सलामीविर शिखर धवनचा फॉर्म चिंतेचा विषय आहे. दुसरीकडे, ऑस्ट्रेलियाचा फिरकी गोलंदाज अॅडम झम्पा भारतीय फलंदाजांसाठी कर्दनकाळ ठरत आहे. त्याने धोनी आणि कोहलीला वारंवार बाद केले आहे.