Umran Malik Shoaib Akhtar: टीम इंडियाचा उदयोन्मुख वेगवान गोलंदाज उमरान मलिक याने फार कमी वेळात नाव कमावले. सातत्याने 150kph पेक्षा जास्त वेगाने गोलंदाजी करणाऱ्या उमरान मलिकने IPL मध्ये 157kph च्या वेगाने साऱ्यांनाच हैराण केला. त्यानंतर उमरान मलिक हा पाकिस्तानचा माजी गोलंदाज रावळपिंडी एक्स्प्रेस शोएब अख्तरचा सर्वात वेगवान गोलंदाजीचा विक्रम मोडेल अशी चर्चा चाहत्यांमध्ये सुरू आहे. उमरानने गोलंदाजीत विक्रम मोडण्याच्या नादात स्वत:ची हाडं खिळखिळी करून घेऊ नये, असा टोमणा मारला होता. त्यावर नुकतीच एका मुलाखतीदरम्यान उमरान मलिकने प्रतिक्रिया दिली.
उमरान मलिक म्हणाला, 'सध्या माझे लक्ष्य गोलंदाजी क्षेत्रात चांगली कामगिरी करून भारतीय संघात निवड होण्याकडे आहे.' उमरान मलिक म्हणाला, 'देशासाठी चांगले काम करणे आणि माझ्या संघाला सामने जिंकवणे हे माझे लक्ष्य आहे. मी वेगवान गोलंदाजी करेन पण माझा भर चांगल्या पद्धतीची गोलंदाजी करण्यावर आहे. मला अजून खूप शिकायचे आहे आणि खूप सराव करायचा आहे. इरफान पठाण प्रत्येक सामन्यानंतर माझ्याशी बोलतात, प्रत्येक सामन्यापूर्वी मला ते खूप समजावून सांगत असतात.'
अख्तरचा रेकॉर्ड मोडणार का? उमरान म्हणाला...
उमरान मलिकला एका मुलाखतीदरम्यान प्रश्न विचारण्यात आला होता. उमरान मलिकला विचारण्यात आले की, 'अख्खं जग बोलतंय की उमरान मलिक शोएब अख्तरचा 161kph चा वेगवान चेंडूचा विक्रम मोडेल, तुला यावर काय बोलायचं आहे, तुझी त्या विक्रमावर नजर आहे का? शोएब अख्तरचा रेकॉर्ड तुझ्याकडून मोडला जाईल की नाही?' त्यावर उमरान मलिक म्हणाला- 'जर देवाची तशी इच्छा असेल तर नक्कीच तसे घडेल. आता माझे लक्ष विकेट्स घेण्यावर आहे. नशिबाने साथ दिली तर शोएब अख्तरचा रेकॉर्ड मी नक्कीच मोडेन'