भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने 9 वर्षापूर्वी, 2 एप्रिल 2011ला विश्वचषक जिंकला होता. भारतीय कर्णधार महेंद्रसिंग धोनीने नुवान कुलसेकराच्या गोलंदाजीवर षटकार खेचत तब्बल 28 वर्षांच्या दिर्घ प्रतीक्षेनंतर भारताला विश्वचषक मिळवून दिला. तसेच धीनीने लगावलेला षटकार 125 करोड भारतवासीयांच्या मनात आजही ताजेतवाना आहे.
2011चा विश्वचषक भारताचा माजी क्रिकेटपटू मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा क्रिकेट कारकीर्दमधला शेवटचा विश्वचषक होता. त्यामुळे भारतीय संघाने हा विश्वचषक जिंकत सचिनला मोठं गिफ्ट दिले होते. विश्वचषकात बाजी मारल्यानंतर भारतीय संघातील खेळाडूंनी सचिनला खांद्यावर उचलून घेत मुंबईतील वानखेडे मैदानावर फिरविले होते. तोच क्षण क्रीडा क्षेत्रात मानाचा म्हणून ओळखला जाणाऱ्या लॉरियस स्पोर्ट्स ॲवॉर्ड्समध्ये गेल्या 20 वर्षांमधला सर्वोच्च क्षण ठरला आहे.
मास्टर ब्लास्टर निवृत्तीनंतरही अव्वल; क्रीडाविश्वातील सर्वोच्च पुरस्काराने सचिन तेंडुलकरचा गौरव
सचिनला खांद्यावर बसवून संपूर्ण मैदानात फिरवल्यानंतर सध्याचा भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने दिलेल्या मुलाखतीत एक भावनिक वक्तव्य केले होते. सचिनने गेल्या 21 वर्षांपासून भारतीय क्रिकेटचे नेतृत्व आपल्या खांद्यावर घेतले होते. त्यामुळे सचिनला खांद्यावर बसवून फिरवणे आमच्यासाठी अभिमानास्पद असल्याचे विरोटने सांगितले होते.
दरम्यान क्रीडाविश्वातला ऑस्कर अशी लॉरियस पुरस्कारांची जगात ओळख आहे. त्याच लॉरियस पुरस्कारांचं सोमवारी जर्मनीची राजधानी बर्लिनमध्ये वितरण करण्यात आलं. सचिन तेंडुलकरनं स्वत: या सोहळ्याला उपस्थित राहून लॉरियस पुरस्कार स्वीकारला. या पुरस्कार विजेत्याची निवड सर्वसामान्य जनतेचा कौल घेऊन करण्यात आली. या पुरस्कारासाठी सचिन तेंडुलकरसह जगभरातील 20 दावेदारांना नामांकन होतं. त्या सर्वांना मागे टाकत सचिनने हा बहुमान आपल्या नावे केला आहे.