भारताचा माजी अष्टपैलू खेळाडू युवराज सिंग याची मैदानावरील पुनरागमनाची तारीख ठरली. यावेळी युवराज सिंगसोबतहरभजन सिंग, वीरेंद्र सेहवाग, युसूफ व इरफान पठाण हे सर्व दिग्गजही एकत्र खेळताना दिसणार आहेत. काही दिवसांपूर्वी युवराजनं पुन्हा एकदा क्रिकेटच्या मैदानावर परतणार असल्याचे संकेत दिले होते आणि त्याचे चाहतेही आनंदात होते. अखेर ती तारीख समोर आली आहे आणि यावेळी युवराज डबल धमाकाच घेऊन मैदानावर उतरणार आहे. Legends League Cricketमधून युवी, वीरू, भज्जी, युसूफ व इरफान हे स्टार पुन्हा एकदा भारतीय संघाकडून खेळणार आहे. ANIनं दिलेल्या वृत्तानुसार आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतलेल्या खेळाडूंसाठी ही लीग असणार आहे. इंडियन महाराजा ( The Indian Maharajas) या संघाकडून भारताचे माजी खेळाडू खेळणार आहेत.
युवराजसह एस बद्रीनाथ, आरपी सिंग, प्रग्यान ओझा, नमन ओझा, मनप्रीत गोनी, हेमांग बदानी, वेणुगोपाळ राव, मुनाफ पटेल, संजय बांगल, नयन मोंगिया आणि अमित भंडारी हेही या लीगमध्ये खेळणार आहेत. २० जानेवारीपासून ओमान येथील अल अमेरट क्रिकेट स्टेडियमवर ही लीग खेळवण्यात येणार आहे. इंडियन महाराजा या संघासह आशिया आणि रेस्ट ऑफ दी वर्ल्ड असे दोन संघाचाही लीगमध्ये सहभाग असणार आहे. भारतीय संघाचे माजी प्रशिक्षक रवी शास्त्री या लीगचे आयुक्त आहेत. ते म्हणाले,''खरे किंग्स पुन्हा एकत्र येत आहेत. दी क्रिकेट महाराजा जगातील दोन तगड्या संघासोबत खेळणार आहे. सेहवाग, भज्जी, युवी हे आफ्रीदी, मुरली, चमिंडा, शोएब यांच्याविरुद्ध खेळणार असल्यानं दर्देदार क्रिकेटची मेजवानी मिळणार आहे.''
आशिया लायन्स संघाकडून शोएब अख्तर, शाहिद आफ्रिदी, सनथ जयसूर्या, मुथय्या मुरलीधरन, चामिंडा वास, रोमेश कालुवितरणा, तिलकरत्ने दिलशान, अझर महमुद, उपुल तरंगा, मिसबाह-उल-हक, मोहम्मद हाफिज, शोएब मलिक, मोहम्मद युसूफ, उमर गुल आणि अस्गर अफगान हे खेळताना दिसतील.