भारतीय संघाने पहिला दिवस-रात्र कसोटी सामना कोलकात्याच्या इडन गार्डन्सवर खेळला होता. या सामन्याला चाहत्यांचा भरघोस प्रतिसाद पाहायला मिळाला होता. पण आता तर जगातील सर्वात मोठ्या स्टेडिममध्ये दिवस-रात्र कसोटी सामना खेळण्याचा मान भारतीय संघाला मिळणार आहे.
भारतीय संघ सध्या न्यूझीलंड दौऱ्यावर आहे. उभय संघांमध्ये दोन कसोटी सामन्यांची मालिका होणार आहे. या मालिकेला 21 फेब्रुवारीपासून सुरुवात होणार आहे. न्यूझीलंड दौऱ्यानंतर भारतीय संघ घरच्या मैदानावर दक्षिण आफ्रिकेशी वन डे मालिकेत मुकाबला करणार आहे. पण, या वर्षाच्या अखेरीस टीम इंडिया ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणार आहे आणि तेथे टीम इंडिया डे-नाईट कसोटी सामना खेळणार असल्याची माहिती बीसीसीआयच्या सूत्रांनी रविवारी दिली. महिनाभरापूर्वी टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीनं खेळाडू ऑस्ट्रेलियात दिवस रात्र कसोटी खेळण्यासाठी तयार असल्याची घोषणा केली होती. त्यामुळे आगामी ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर टीम इंडिया डे-नाईट कसोटी खेळेल,असं बीसीसीआयकडून सांगण्यात आलं.
भारतीय संघानं नोव्हेंबर 2019मध्ये कोलकाता येथील इडन गार्डनवर पहिला दिवस रात्र कसोटी सामना खेळला होता. बांगलादेशविरुद्धच्या त्या सामन्यात टीम इंडियानं दणदणीत विजय मिळवला होता. त्या कसोटीनंतर ऑस्ट्रेलियाचा कर्णधार टीम पेन यानं टीम इंडियाला ऑस्ट्रेलियात डे नाईट कसोटीचं आव्हान दिलं होतं. पेन म्हणाला होता की, " ऑस्ट्रेलियामध्ये गावस्कर-बोर्डर ट्रॉफी खेळवण्यात येणार आहे. ब्रिस्बेनपासून या कसोटी मालिकेला सुरुवात होणार आहे. मालिकेत भारताने एक दिवस रात्र कसोटी सामना खेळावा, असे आम्हाला वाटते. याबाबत आम्ही त्यांना विनंती करणार आहोत."
पण आता jagran.comने दिलेल्या वृत्तानुसार भारतीय संघ ऑस्ट्रेलियामध्ये एक आणि जगातील सर्वात मोठ्या स्टेडियमवर एक असे दोन दिवस रात्र कसोटी सामने खेळणार आहे. आता जगातील सर्वात मोठे स्टेडियम आहे तरी कुठे आणि हा सामना होणार तरी कधी, हे जाणून घेण्याची उत्सुकता तुम्हाला लागली असेल...
जगातील सर्वात मोठे स्टेडियम आहे तरी कुठे...गुजरातमधील अहमदाबाद येथे हे जगातील सर्वात मोठे स्टेडियम बनवले जात आहे. हे स्टेडियम बांधण्यासाठी ७०० कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत. जानेवारी २०१७मध्ये या स्टेडियमच्या बांधणीला सुरुवात झाली होती. आता काही दिवसांमध्ये हे स्टेडियम सज्ज होणार आहे.
या स्टेडियममध्ये काय असेल...हे स्टेडियम ६३ एकर जागेमध्ये बनवण्यात येणार आहे. त्याचबरोबर या स्टेडियममध्ये ५० खोल्याही येणार आहेत. त्याचबरोबर ऑलिम्पिक साईजचे स्विमिंग पूल असून ७३ कॉर्पोरेट बॉक्स आहेत. त्याचबरोबर तीन प्रॅक्टीस मैदानंही बनवण्यात आली आहेत.
या स्टेडियमची आसन क्षमता केवढी असेल...या स्टेडियममध्ये १ लाख १० हजार एवढी आसन व्यवस्था करण्यात आली. त्यामुळे हे स्टेडियम जगातील सर्वात मोठे स्टेडियम असणार आहे.