प्रोव्हिडेन्स (गयाना) : गोलंदाजांच्या सुरेख कामगिरीनंतर जेमिमा रॉड्रिग्जच्या दमदार फटकेबाजीच्या जोरावर भारतीय महिला संघाने तिसऱ्या टी२० सामन्यात वेस्ट इंडीजचा सात बळी राखून पराभव केला. यासह पाच सामन्यांच्या मालिकेत भारतीयांनी ३-० अशी विजयी आघाडी घेतली. भारतीय फिरकीपटूंनी वेस्ट इंडीजला २० षटकांत ९ बाद ५९ धावांत रोखले. त्यानंतर रॉड्रिग्जच्या ५१ चेंडूंतील नाबाद ४० धावांच्या खेळीच्या बळावर भारताने ३ फलंदाजांच्या मोबदल्यान आणि २० चेंडू राखून विजयी लक्ष्य गाठले. अशा प्रकारे भारताने सलग दुसरी टी२० मालिका जिंकली. भारताने गेल्या महिन्यात घरच्या मैदानावर दक्षिण आफ्रिकेला धूळ चारली होती. वेस्ट इंडीजचा टी२० आंतरराष्ट्रीय लढतीतील हा सलग सहावा पराभव ठरला. फिरकी गोलंदाज राधा यादव, दीप्ती शर्मा, पूनम यादव आणि अनुजा पाटील यांनी भारतीय विजयाचा भक्कम पाया रचला. राधा यादव व दीप्ती शर्मा यांनी अनुक्रमे ६ व १२ धावांत प्रत्येकी २ गडी बाद केले. पूनम यादव व अनुजा पाटील यांनी प्रत्येकी १ गडी बाद केला.
प्रथम फलंदाजीचा निर्णय घेणाºया वेस्ट इंडीजची सुरुवात खराब झाली. त्यांची आघाडीची फलंदाज हेली मॅथ्यूज (७), स्टेसी एन. किंग (७) आणि शेमाइल कॅम्पबेल (२) या स्वस्तात तंबूत परतल्या. वेस्ट इंडीजचा संघ ६ षटकांच्या पहिल्या पॉवरप्लेमध्ये फक्त १२ धावाच करू शकला. अनुजाने तिसºया षटकात मॅथ्यूजला बाद करीत भारताला पहिले यश मिळवून दिले. त्यानंतर कॅम्पबेल आणि किंगदेखील तंबूत परतल्या. वेस्ट इंडीजकडून फक्त चेडीन नेशन (११) आणि चिनेली हेन्री (११) याच दोघी दुहेरी आकडी धावा पार करू शकल्या.
छोट्या लक्ष्याचा पाठलाग करणाºया भारतीय संघाची सुरुवात चांगली झाली नाही व सलग दोन अर्धशतक झळकावणारी शेफाली वर्मा या वेळेस भोपळाही फोडू शकली नाही. स्मृती मानधनाही (३) लवकर बाद झाली, तसेच कर्णधार हरमनप्रीत कौर ७ धावाच करू शकली. तथापि, रॉड्रिग्जने खंबीरपणे खेळी करीत संघाला विजयी लक्ष्यापर्यंत पोहोचवले. वेस्ट इंडीजकडून हायली मॅथ्यूजने ७ धावांत २ गडी बाद केले. पाच सामन्यांच्या मालिकेतील पुढील लढत येथे रविवारी खेळवली जाईल.
>संक्षिप्त धावफलक
वेस्ट इंडिज (महिला) : २० षटकात ९ बाद ५९ धावा (चेडीन नेशन ११, चिनेली हेन्री ११; राधा यादव २/६, दीप्ती शर्मा २/१२.) पराभूत वि. भारत (महिला) : १६.४ षटकात ३ बाद ६० धावा (जेमिमा रॉड्रिग्स ४०; हायली मॅथ्यूज २/७.)
जेमिमा रॉड्रिग्स (डावीकडे) आणि टी२० कर्णधार हरमनप्रीत कौर यांनी भारताचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. मात्र हरमनप्रीत झटपट परतल्यानंतर युवा जेमिमाने भारताचा विजय निश्चित केला.
Web Title: The Indian women's team took the winning lead
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.