मुंबई : विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या भारतीय संघाने मागील काही वर्षांत आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये चांगलाच दबदबा निर्माण केला आहे. ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड यांना त्यांच्याच भूमीत नमवण्याचा पराक्रम नुकताच विराटसेनेने करून दाखवला, त्यांच्याच पावलावर पाऊल टाकत भारतीय महिलांनीही न्यूझीलंडमध्ये ऐतिहासिक विजय मिळवला. भारतीय पुरुष संघाप्रमाणेच मिताली राजच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या महिला संघानेही आंतरराष्ट्रीय स्तरावर आपलं नाणं खणखणीत वाजवलं आहे. भारतीय क्रिकेटमधील हे दोन आघाडीचे कर्णधार एकाच संघातून खेळले तर, होय हे शक्य होणार आहे. लवकरच आपल्याला कोहली आणि मिताली राज एकाच संघातून खेळताना दिसणार आहेत. #ChallengeAccepted या मोहीमे अंतर्गत प्रथमच महिला व पुरुष खेळाडूंचा समावेश असलेल्या क्रिकेट सामन्याचे आयोजन करण्यात येणार आहे.
सध्या एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे आणि त्यात मिताली राज, हरमनप्रीत कौर, वेदा कृष्णमुर्ती या महिला क्रिकेटपटूंसह विराट कोहली एक संदेश देत आहेत. त्यात आगामी काळात महिला व पुरुष एकाच संघातून एकत्र खेळताना दिसतील असे सांगण्यात आले आहे.
पाहा व्हिडीओ...