INDW vs AUSW Live | मुंबई : भारतीय महिला संघ मायदेशात वन डे मालिका खेळत आहे. तीन सामन्यांच्या मालिकेतील सलामीचा सामना जिंकून पाहुण्या ऑस्ट्रेलियाने १-० ने आघाडी घेतली. आज मालिकेतील दुसरा सामना खेळवला जात आहे. पहिल्या सामन्याला मुकलेल्या स्मृती मानधनाने आजच्या सामन्यातून पुनरागमन केले आहे. तसेच श्रेयांका पाटीलने आजच्या सामन्यातून भारतीय संघात पदार्पण केले आहे. ऑस्ट्रेलियन कर्णधार ॲलिसा हिलीने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. लक्षणीय बाब म्हणजे आज टीम इंडियाचे खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळाले. खरं तर हरमनप्रीत कौर आणि स्मृती मानधना यांनी देखील सोपे झेल सोडले.
दरम्यान, भारतीय संघाने आज तब्बल सातवेळा ऑस्ट्रेलियन फलंदाजांना जीवनदान दिले. भारतीय कर्णधार हरमनप्रीत कौर, उपकर्णधार स्मृती मानधना, दीप्ती शर्मा आणि यास्तिका भाटिया यांनी सोपे झेल सोडले. भारतीय संघाच्या खराब क्षेत्ररक्षणाचा फायदा घेत ऑस्ट्रेलियाने मोठी धावसंख्या उभारली. पाहुण्या संघाने निर्धारित ५० षटकांत ८ बाद २५८ धावा केल्या. भारताकडून दीप्ती शर्माने सर्वाधिक पाच बळी घेतले, तर स्नेह राणा, श्रेयांका पाटील आणि पूजा वस्त्राकर यांना प्रत्येकी १-१ बळी घेण्यात यश आले.
आजच्या सामन्यासाठी भारतीय संघ -हरमनप्रीत कौर (कर्णधार), स्मृती मानधना, जेमिमा रॉड्रिग्ज, यास्तिका भाटिया, रिचा घोष, स्नेह राणा, अमनजोत कौर, दीप्ती शर्मा, पूजा वस्त्राकर, श्रेयांका पाटील, रेणुका सिंग.
दरम्यान, आजच्या सामन्यातून श्रेयांका पाटीलने भारतीय संघात पदार्पण केले आहे. श्रेयांका पाटील ही बंगळुरूची रहिवासी असून वयाच्या ८ व्या वर्षापासून तिने क्रिकेट खेळायला सुरूवात केली. श्रेयांका टीम इंडियाचा स्टार फलंदाज विराट कोहलीला क्रिकेटमधला तिचा आदर्श मानते. याशिवाय श्रेयांका आयपीएलच्या पहिल्या सत्रापासून रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाला चीअर करत आली आहे.