India vs Bangladesh ICC Women's World Cup : भारतीय महिला संघाने वर्ल्ड कप स्पर्धेच्या उपांत्य फेरीच्या दिशेने सकारात्मक पाऊल टाकले आहे. मिताली राजच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या भारतीय संघाने मंगळवारी बांगलादेश महिला संघावर मोठा विजय मिळवला. या विजयासोबतच भारताने नेट रन रेटमध्ये कमालीची सुधारणा करताना उपांत्य फेरीच्या शर्यतीत असलेल्या अन्य संघांची डोकेदुखी वाढवली आहे. यास्तिका भाटिया ( Yastika Bhatia) च्या अर्धशतकी खेळीला स्मृती मानधना, शेफाली वर्मा, पूजा वस्त्राकर, रिचा घोष व स्नेह राणा यांची साथ मिळाली. त्यानंतर भारतीय गोलंदाजांनी त्यांच्यावरील जबाबदारी योग्य रितीने पार पाडली.
स्मृती व शेफाली यांनी भारतीय संघाला चांगली सुरूवात करून देताना पहिल्या विकेटसाठी ७४ धावा जोडल्या. स्मृती ३० धावांवर माघारी परतली. त्यानंतर शेफालीही ४२ धावांवर बाद झाली. मिताली राजही भोपळ्यावर बाद झाल्याने भारताची अवस्था ३ बाद ७४ अशी झाली. हरमनप्रीत कौरही १४ धावाच करू शकली. पण, यास्तिकाने रिचा घोषला सोबतिला घेऊन संघाचा डाव सावरला. या दोघिंनी अर्धशतकी भागीदारी केली. रिचा २६ धावांवर बाद झाली, यास्तिकाही ५० धावांवर माघारी परतली. पूजा वस्त्राकर व स्नेह यांनी अर्धशतकी भागीदारी करून भारताची धावसंख्या दोनशेपार नेली. स्नेह २३ चेंडूंत २७ धावा करून बाद झाली, तर पूजाने ३३ चेंडूंत नाबाद ३० धावा केल्या. भारताने ७ बाद २२९ धावा उभ्या केल्या.
त्युत्तरात
बांगलादेशचा निम्मा संघ ३५ धावांवर माघारी परतला. स्नेह राणाने दोन झटके दिले. पूजा, पूनम यादव, राजेश्वरी गायकवाड यांची साथ मिळाली. भारतासाठी डोईजड होत असलेल्या सल्मा खातूनची ( ३२) विकेट अनुभव झुलन गोस्वामीने घेतली. राजेश्वरीने सुरेख गोलंदाजी केली तिने १० पैकी ४ षटकं निर्धाव फेकली अन् १५ धावांत १ विकेट घेतली.
पूजाने २६ धावांत २ विकेट्स घेतल्या. पूनमच्या नावावर एक बळी राहिला. स्नेहने १०पैकी २ षटकं निर्धाव फेकताना ३० धावांत सर्वाधिक ४ विकेट्स घेतल्या. यंदाच्या वर्ल्ड कप स्पर्धेत तिच्या नावावर सर्वाधिक १० विकेट्स आहेत. झुलनने दोन विकेट घेत बांगलादेशचा संघ ११९ धावांवर माघारी पाठवला. भारताने हा सामना ११० धावांनी जिंकला.
Web Title: INDWvsBANW, ICC Women's World Cup : Bangladesh have been bowled out for 119, as India complete a stunning 110-run win, The hope of a spot in the semi-final lives on
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.