India WIN by nine wickets : भारतीय पुरुष संघानं इंग्लंडविरुद्धच्या वन डे सामन्यात दमदार कमबॅक करताना विजय खेचून आणला. कृणाल पांड्या व प्रसिद्ध कृष्णा या पदार्पणवीरांनी टीम इंडियाच्या या विजयात वर्ल्ड रेकॉर्डची नोंद केली. तेच दुसरीकडे भारतीय महिला संघानेही तिसऱ्या ट्वेंटी-२० सामन्यांत दक्षिण आफ्रिकेच्या महिला संघावर ९ विकेट्स व ५४ चेंडू राखून विजय मिळवला. आफ्रिकेचे ११३ धावांचे लक्ष्य टीम इंडियानं ११व्या षटकातच पूर्ण केले आणि मालिकेत पहिल्या विजयाची नोंद केली. आफ्रिकेनं ही मालिका २-१ अशी जिंकली. पण, या सामन्यात १७ वर्षीय शेफाली वर्मा ( Shafali Verma) हीनं आफ्रिकेच्या गोलंदाजांची शिकार केली. भारतीय संघाचे विजयी कमबॅक; कृणाल पांड्या, प्रसिद्ध कृष्णा यांचे संस्मरणीय पदार्पण
या मालिकेतील दमदार कामगिरीच्या जोरावर शेफालीनं आयसीसीनं मंगळवारी जाहीर केलेल्या ट्वेंटी-२० महिला फलंदाजांच्या क्रमवारीत अव्वल स्थान पटकावले होते. शेफाली वर्मानं आफ्रिकेविरुद्धच्या दोन ट्वेंटी-२० सामन्यांत अनुक्रमे २३ व ४७ धावा केल्या आहेत. तिच्या खात्यात ७५० गुणांसह अव्वल स्थान पटकावलं आहे. तिसऱ्या ट्वेंटी-२० सामन्यापूर्वी शेफालीनं २१ ट्वेंटी-२० सामन्यांत दोन अर्धशतकांसह ५५७ धावा केल्या होत्या. तिसऱ्या सामन्यात तिचा आक्रमक अंदाज पाहायला मिळाला.
आफ्रिकेनं सून लूस ( कर्णधार) व लारा गूडबॉल यांच्या अनुक्रमे २८ व २५ धावांच्या जोरावर ७ बाद ११२ धावा केल्या. राजेश्वरी गायकवाडनं ४ षटकांत ९ धावा देत ३ विकेट्स घेतल्या. तिनं एक निर्धाव षटकही फेकलं. या लक्ष्याचा पाठलाग करताना शेफाली आणि कर्णधार स्मृती मानधना यांनी ९६ धावांची सलामी दिली. शेफालीनं ३० चेंडूंत ६० धावा कुटल्या. यापैकी केवळ दोन धावा तिनं पळून काढल्या, उर्वरित ५८ धावा या ७ चौकार व ५ षटकारांतून खेचल्या. तिनं २६ चेंडूंत अर्धशतक पूर्ण केलं. महिला क्रिकेटमध्ये ट्वेंटी-२०तील हे भारतीय खेळाडूनं नोंदवलेलं तिसरे जलद अर्धशतक ठरले. मानधनानं ( २४ चेंडू वि. न्यूझीलंड, २०१९ व २५ चेंडूंत) सर्वात जलद अर्धशतकाचा विक्रम केला आहे.