नवी दिल्ली : काही वर्षांपूर्वी क्रिकेटमध्ये दोनशे धावा करणंही संघांसाठी कठिण समजलं जायचं. पण भारताचा माजी महान फलंदाज, मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडुलकरने एकदिवसीय क्रिकेटमध्ये पहिल्यांदा द्विशतक झळकावले आणि क्रिकेट विश्वाला सुखद धक्का बसला. एकदिवसीय क्रिकेटमध्ये द्विशतक होऊ शकतं, असा विश्वास आता चाहत्यांना बसला आहे, पण ट्वेन्टी-20 क्रिकेटमध्ये जिथे संघाचा दोनशे धावा होत नाहीत, तिथे एक खेळाडू एवढ्या धावा करू शकतो का, हा प्रश्न चाहत्यांना पडलेला आहे. पण भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुलीने मात्र हे शक्य असल्याचे सांगितले आहे. त्याचबरोबर ट्वेन्टी-20 क्रिकेटमध्ये कोणता खेळाडू द्विशतक झळकावू शकतो, हेदेखील गांगुलीने यावेळी सांगितले आहे.
यावेळी गांगुली म्हणाला की, " या आयपीएलच्या हंगामात ' हा ' फलंदाज दमदार कामगिरी करू शकतो. त्याच्याकडून या हंगामात आपल्याला द्विशतकी खेळीही पाहता येऊ शकते. ' हा ' फलंदाज एका संघाचा कर्णधार आहे आणि त्याच्या फलंदाजीवर सारेच फिदा आहेत, " असे 'अ सेंचुरी इज नॉट इनफ' या आत्मचरीत्राच्या अनावरणप्रसंगी गांगुलीने सांगितले.
' हा ' फलंदाज नेमका कोण, असा विचार तुम्ही करत असाल. ' हा ' फलंदाज एका संघाचा कर्णधार आहे, असे म्हटल्यावर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा कर्णधार विराट कोहलीचे नाव तुम्हाला लगेच आठवले असेल. पण गांगुलीने मात्र कोहलीचे नाव घेतलेले नाही.
गांगुली पुढे म्हणाला की, " सचिनने एकदिवसीय क्रिकेटमध्ये पहिले द्विशतक झळकावले. त्यानंतर रोहित शर्माने त्याचा कित्ता गिरवला. पण आयपीएलच्या या हंगामात रोहित द्विशतक झळकावू शकतो, असा मला विश्वास आहे. कारण रोहित सध्या चांगल्या फॉर्मात आहे आणि त्याच्याकडून मी द्विशतकाची अपेक्षा करत आहे. "