चेन्नई : चेन्नई आणि कोलकाता यांच्या सामन्यावेळी चार हजार सुरक्षा रक्षक तैनात करण्यात येणार आहेत. कारण कावेरी मुद्द्यावरुन एका तमिळ संघटनेने स्टेडियमबाहेर आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. तब्बल तीन वर्षांच्या कालावधीनंतर इथे सामना होत असून सर्वच तिकीटे विकली गेली आहेत. आयपीएलच्या एकूण सात सामन्यांचं इथे आयोजन होणार आहे. झंडे आणि बॅनरला इथे बंदी घालण्यात आलीये.
तामिळनाडू सरकारचे मत्स्य मंत्री डी जयकुमार म्हणाले की, क्रिकेट बोर्डला आमच्या भावना कळवण्यात आल्या आहेत. टीवीके या तमिळ संघटनाने धमकी दिली आहे की, जर हा सामना झाला तर स्टेडीयमला घेराव घालण्यात येईल.
दरम्यान, आयपीएलमध्ये चेन्नई सुपरकिंग्जच्या खेळाडूंनी हाताला काळी पट्टी बांधावी, अशी मागणी रजनीकांतनं केली आहे. तामिळनाडूमध्ये सध्या कावेरीच्या पाण्याचा वाद सुरु आहे. कावेरी प्रबंधन बोर्डाची स्थापना न झाल्यामुळे रविवारी तामिळनाडू अॅक्टर्स असोसिएशननं विरोध-प्रदर्शन आयोजीत केलं होतं. यामध्ये प्रमुख अभिनेते उपस्थित होते. यामध्ये रजनीकांत, इलैया राजा, कमल हसन, धनुष, विजय हे कलाकार आंदोलनाच्या ठिकाणी आले. या आंदोलनावेळी चेन्नई सुपरकिंग्जच्या टीमनं हातावर काळी पट्टी बांधावी अशी मागणी रजनीकांतनं केली.
आयपीएलवर बहिष्काराची मागणी
कावेरी नदीच्या पाणी वादावरून आयपीएलवर बहिष्कार टाकण्याची मागणी शशिकला यांचा भाचा टीवी दिनकरन यांनी केली होती. कावेरी वाद सुरु असताना चेन्नईमध्ये आयपीएल खेळवलं नाही पाहिजे, पण जर खेळाडूंना खेळायचंच असेल तर त्यांनी काळ्या पट्ट्या बांधाव्यात, असं रजनीकांत म्हणाले आहेत. कावेरी प्रबंधन बोर्ड आणि सीडब्ल्यूआरसीची स्थापना झाली तरच कावेरीचा मुद्दा सुटेल आणि न्यायाचा विजय होईल, अशी प्रतिक्रिया रजनीकांत यांनी दिली.
आयपीएलपासून लांब राहा
एएमएमकेचे नेते दिनकरन यांनी आयपीएलपासून क्रिकेट रसिकांनी लांब राहावं, असं आवाहन केलं आहे. कावेरी प्रबंधन बोर्डाची स्थापना करून शेतकऱ्यांचा आवाज बुलंद करण्यासाठी नागरिकांनी आयपीएलपासून लांब राहावं, असं दिनकरन म्हणालेत.
सरकारचं सुरक्षा देण्याचं आश्वासन
चेन्नईमध्ये आयपीएलला विरोध होत असतानाच राज्य सरकारनं मात्र आयपीएलला योग्य सुरक्षा व्यवस्था पुरवली जाईल, असं आश्वासन दिलं आहे. आयपीएलच्या आयोजकांनी सुरक्षेची मागणी केली तर त्यांना आम्ही नाही म्हणू शकत नाही, असं वक्तव्य एआयएडीएमकेचे नेते आणि मंत्री डी जयकुमार यांनी केलं आहे. १० एप्रिल ते २० मे पर्यंत चेन्नईमध्ये ७ मॅच होणार आहेत.