नवी दिल्ली : आयपीएल सुरु होण्यापूर्वीच महेंद्रसिंग धोनीच्या चेन्नई सुपर किंग्जला मोठा धक्का बसला आहे. कारण त्यांच्या संघातील हा धडाकेबाज फलंदाज दुखापतीमुळे खेळणार की नाही, याबाबत शंका व्यक्त केली जात आहे.
दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार आणि धडाकेबाज फलंदाज फॅफ ड्यू प्लेसिसला दुखापत झाली आहे. त्यामुळे तो आयपीएलमध्ये खेळू शकणार नाही. भारताविरुद्धच्या दौऱ्यात फॅफच्या बोटाला जबर दुखापत झाली होती. त्यानंतर त्याला भारताविरुद्धच्या पाच एकदिवसीय आणि तीन ट्वेन्टी-20 सामन्यांमध्ये खेळता आले नव्हते. पण त्यानंतर त्याने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेत संघात पुनरागमन केले होते. ही मालिका दक्षिण आफ्रिकेने 3-1 अशा फरकाने जिंकली.
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या अखेरच्या कसोटी सामन्यात पुन्हा एकदा फॅफच्या बोटाला दुखापत झाली. पण तरीही या सामन्यातील दुसऱ्या डावात त्याने 120 धावांची खेळी साकारली. पहिल्या डावात मात्र त्याला भोपळाही फोडता आला नव्हता. या दुखापतीमुळे त्याच्या आयपीएलच्या सहभागाबाबत संदिग्धता आहे.
फॅफ हा चेन्नईच्या संघाचा अविभाज्य भाग आहे. दोन वर्षांनी चेन्नईचा संघ आयपीएलमध्ये पुनरागमन करत आहे. पण स्पर्धेत उतरण्यापूर्वी त्यांना फॅफच्या रुपात मोठा धक्का बसला आहे. यापूर्वी चेन्नईचा मिचेल सँटनरही दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर पडला आहे.