प्रसाद लाड : महेंद्रसिंग धोनी... एक चाणाक्ष कर्णधार म्हणून त्याची किर्ती सर्वदूर पसरलेली आहे. यष्ट्यांमागे उभा राहत तो ज्या काही रणनिती वापरतो, त्याचा अदमास कुणालाही लागत नाही. आपल्या रणनीतीच्या जोरावर तो प्रतिस्पर्धी फलंदाजांना आपल्या चक्रव्यूहात लीलया फसवताना साऱ्यांनीच पाहिले आहे. पण आता धोनी आपल्याच चक्रव्यूहात फसत चाललाय आणि हेच आयपीएलमधल्या पहिल्या दोन सामन्यांमध्ये पाहायला मिळाले आहे. ' मॅच फिनीशर ' ही त्याची क्रिकेट जगतामध्ये ओळख आहे, पण त्याची हीच ओळख हळूहळू पुसत चालली आहे.
ऑस्ट्रेलिया-न्यूझीलंडमधल्या विश्वचषकापासून खरं तर या गोष्टीला सुरुवात झाली, असं आपण म्हणू शकतो. भारत आणि ऑस्ट्रलिया यांच्यातील सामन्यात भारताची पडझड झाल्यावर धोनी फलंदाजीला आला होता. त्यावेळी सामना काही हातून निसटलेला नव्हता. धोनी अखेरच्या षटकापर्यंत उभा राहून हा सामना भारताला जिंकवून देईल, असं वाटत होतं, पण तसं घडलं मात्र नाही. त्यानंतर धोनीच्या बॅटला काहीसा गंज चढायला सुरुवात झाली. काही वेळा त्याने हा गंज काढला देखील, पण त्याने आपली ' मॅच फिनीशर ' ही ओळख गमवायला सुरुवात केली आहे.
धोनीची फलंदाजीची शैली साऱ्यांनाच माहिती आहे. तो फलंदाजीला आल्यावर पहिले काही चेंडू ढकलत खेळतो. एक पाय पुढे काढून चेंडू बॅटवर घेतो आणि जिथे जागा दिसेल तिथे चेंडू ढकलतो. धोनीला स्थिरस्थावर व्हायला 15-20 चेंडू लागतात, त्यानंतर मात्र धोनी मोठे फटके लगावतो. पण गेल्या काही सामन्यांमध्ये मात्र असे घडताना दिसत नाही.
यंदाच्या आयपीएलचा पहिला सामना आठवून पाहा. मुंबई इंडियन्सविरुद्ध धोनी पाचव्या स्थानावर फलंदाजीला आला. मयांक मार्कंड हा नवखा फिरकीपटू. पण त्याने धोनीच्या फलंदाजीचा चांगला अभ्यास केला होता. जलदगतीने मयांकने धोनीच्या पॅडच्या जवळ चेंडू टाकला आणि त्याला फक्त पाच धावांवर पायचीत पकडले. त्यानंतरच्या दुसऱ्या सामन्यातही धोनी फिरकीपटूंच्या गोलंदाजीवर चकताना पाहायला मिळाले. कोलकाताचा फिरकीपटू सुनील नरीनच्या गोलंदाजीवर धोनी पुन्हा फसला. पण पंचांनी त्याला नाबाद ठरवले. त्यानंतर धोनीने बॅट खाली मिळालेल्या कुलदीप यादवच्या चेंडूवर षटकारही ठोकला. धोनी आता रंगात आला असं वाटायला लागलं, पण पीयुष चावलाने आपल्या फिरकीच्या जाळ्यात धोनीला फसवलं आणि मोक्याच्या क्षणी धोनीला तंबूची वाट धरावी लागली.
धोनीची फलंदाजीची एक रणनीती आहे. पण आता ती जुनी झाली. त्यामध्ये धोनीने बदल केलेला नाही. प्रतिस्पर्ध्यांनी हा धोनीचा कच्चा दुवा जाणला आहे. त्यामुळे तो जेव्हा फलंदाजीला येतो तेव्हा फिरकीपटूला वेगवान चेंडू टाकायला सांगितले जात आहे. धोनीने आता गरज आहे ती आपली फलंदाजीची रणनीती बदलण्याची. पण जर त्याने ही रणनीती बदलली नाही तर त्याचा अभिमन्यू होण्या वाचून राहणार नाही.