मुंबई : आयपीएलच्या यंदाच्या हंगामात सलामीची लढत मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यामध्ये होणार आहे. पण यावेळी मुंबईचा कर्णधार रोहित शर्मा जर सलामीला आला नाही तर आश्चर्य वाटून घेऊ नका, कारण यावेळी संघातील युवा खेळाडूंना संधी देण्यासाठी रोहितने सलामीला न येण्याचा निर्णय घेतला आहे.
सलामीची लढत वानखेडे स्टेडियमवर होणार आहे. त्यामुळे आपल्या घरच्या मैदानात विजयी सलामी देण्यासाठी मुंबईचा संघ उत्सुक आहे. विजय मिळवण्यासाठी मुंबईचा संघ या मोसमात रणनीतीमध्ये काही बदल करणार आहे. यामधला सर्वात मोठा बदल म्हणजे रोहित यावेळी सलामीला येणार नाही.
याबद्दल रोहित म्हणाला की, " मी आता माझ्या फलंदाजीच्या क्रमवारीबाबत जास्त काही सांगू शकत नाही. मधल्या फळीमध्ये चांगले फलंदाज आहेत. त्याचबरोबर इशान किशन आणि इव्हिन लुईस हे दोन युवा सलामीवीर आहेत. त्यांना जर सलामीची संधी दिली तर संघासाठी ही चांगली गोष्ट असेल. एक कर्णधार म्हणून मी त्यांच्यासाठी सलामीला येण्याचे टाळू शकतो."