Join us  

IPL 2018: आयपीएल जिंकण्यासाठी मालक काय-काय करतात बघा... चक्रावून जाल!

संघाच्या विजयासाठी मालक मंडळी अनेक मार्गांचा आधार घेतात.

By ऑनलाइन लोकमत | Published: May 08, 2018 9:58 AM

Open in App

मुंबई : क्रिकेट हा खेळ 22 यार्डांमध्ये खेळला जातो. नेतृत्व, फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण हे विजयाचे चार आधारस्तंभ. यापैकी एकही ढासळला तर पराभव निश्चितच. पण काही वेळा सामना जिंकण्यासाठी चाहते देवाला साकडं घालतात, पूजा-अर्चा करतात. चाहत्यांचं ठिक आहे, ते असतातच क्रिकेटवेडे. आता तर आयपीएलमध्ये संघाचे मालकही विजयासाठी होम, हवन आणि बरंच काही करत असल्याचं समोर आलं आहे. ही श्रद्धा की अंधश्रद्धा, हा भाग निराळा. पण एकंदरीत विजयासाठी हे मालक नेमकं काय करतात, ते तरी जाणून घेऊया...

साल 2015. किंग्ज इलेव्हन पंजाबचे तीन सामने पुण्यात खेळवण्यात येणार होते. हे सामने आपण जिंकावेत, असं संघ मालकीण प्रीती झिंटाला वाटतं होतं. त्यासाठी तिने काय केलं ते बघा. तिने चक्क एका भटजीबुवांना स्टेडियमच्या ड्रेसिंग रुममध्ये आणलं. हे भटजीबुवा फारच कडक होते. आपण सांगू ती पूर्व दिशा, असाच त्यांचा हेका होता. त्यांनी ड्रेसिंगरुममध्ये चक्क होम करायला सुरुवात केली. त्यामध्ये आहुती देण्यासाठी त्यांनी चक्क मैदानातील गवत मागवले. हे तर काहीच नाही, त्यानंतर त्यांनी जी अट घातली ती खेळाडूंचे मन दुखावणारी होती. या भटजीबुवांनी जाहीर केले की, आज सकाळी ज्यांनी अंड खाल्ले आहे किंवा मांसाहार केला आहे, त्यांनी ड्रेसिंगरुममध्ये यायचं नाही. अंड किंवा मांस हे खेळाडूंच्या रोजच्याचा आहाराचा एक भाग असतो. त्यामुळे ही अट मान्य करारचं ठरवलं तर बहुतेक खेळाडूंना ड्रेसिंग रुमबाहेर राहावे लागले असते. अखेर महाराष्ट्र क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष अजय शिर्के यांनी हस्तक्षेप केला आणि प्रकरण हाताबाहेर जाण्यापासून थांबलं.

प्रीती झिंटाने हे सारं केलं, पण किती सामने पंजाबचा संघ जिंकला ते तर विचारा. तीन सामन्यांपैकी पंजाबला एकही सामना जिंकता आला नाही. ज्या विजयासाठी एवढा होम हवन केला, त्याचा फायदा संघाला झाला नाही. पण मालकीण बाईंना मात्र झाला. आता तुम्ही विचाराल, कसा? तर या तीन सामन्यांमध्ये  ' गेटमनी ' म्हणून पंजाबच्या संघाने कमावले तब्बल दहा कोटी रुपये. एवढे पैसे त्यांना आपल्या घरच्या मैदानात म्हणजेच मोहालीलादेखील कमावता आले नव्हते.

चेन्नईच्या संघाचे लाल ठिपकेचेन्नई सुपर किंग्ज संघाचे मालक एन. श्रीनिवासन हेदेखील देवभोळे आहेत. त्यामुळे आयपीएलच्या प्रत्येक मोसमात चेन्नईच्या ड्रेसिंग रुममध्ये बरेच बदल केले जातात. आयपीएलच्या 2012 च्या मोसमाची अंतिम फेरीत चेन्नई आणि कोलकाता या दोन संघांमध्ये होणार होती. या सामन्यापूर्वी कोलकात्याच्या ड्रेसिंग रुममध्ये लाल ठिपके पाहायला मिळाले. हे ठिपके कुंकवाचे असल्याचे काही जणांनी सांगितले. हे चेन्नईच्या संघ मालकांनी का केले कुणास ठाऊक, पण चेन्नईला मात्र हा सामना गमवावा लागला होता. पण त्यानंतर दुसऱ्या मोसमात जेव्हा कोलकात्याचा संघ ड्रेसिंग रुमममध्ये गेला तेव्हा मात्र ते लाल ठिपके गायब होते.

मुंबईच्या ड्रेसिंग रुममध्ये खेळाडूंची वेळ ठरलेलीबऱ्याच जणांना राशी भविष्यावर विश्वास असतो. अंबानी कुटुंबियही त्यापैकीच एक. अंबानी यांनी संघातील प्रत्येक खेळाडूंची रास कोणती, हे एका ज्योतिषाकडून जाणून घेतले. फक्त एवढेच नाही तर या खेळाडूंना राशींनुसार कोणत्यावेळेला ड्रेसिंग रुममध्ये यायचे, हेदेखील त्यांनी जाणून घेतले आहे. ' त्या ' वेळेनुसारच खेळाडूंना ड्रेसिंग रुममध्ये येण्याची परवानगी दिली जाते.

अन्... कोलकात्याने आपला रंग बदललापहिल्या हंगामात कोलकात्याचा काळा आणि सोनेरी रंगांचा ड्रेस होता. पण संघातील ज्योतिषांनी मात्र त्याला विरोध दर्शवला होता. त्यामुळेच कोलकात्याने आपल्या ड्रेसचा रंग बदलला. आपल्या ड्रेसमधील काळा रंग काढून त्यांनी जांभळ्या रंगाला पसंती दिली.

राशींवरून ठरतात खेळाडूंच्या ड्रेसिंग रुममधल्या जागाआयपीएलमधील बरेच संघांचे मालक राशीनुसार जे भविष्य सांगितले जाते त्यावर विश्वास ठेवणारे आहेत. त्यामुळेच आपल्या ज्योतिषाला सांगून ते प्रत्येक खेळाडूची पत्रिका काढून घेतात आणि पत्रिकेनुसारच त्यांना ड्रेसिंग रुममध्ये जागा देण्यात येत असल्याचेही समोर आले आहे.

अश्विनसाठी 23 क्रमांक ठरतोय लकीफिरकीपटू आर. अश्विनला आयपीएलचा गेला हंगाम फारसा चांगला गेला नव्हता. पण तो या हंगामात जोरदार पुनरागमन करेल, असे प्रसिद्ध अंकतज्ञ संजय जुमानी यांनी सांगितले. पण त्यासाठी त्याने 23 क्रमांकाची जर्सी घालायला हवी, अश्विनसाठी 23 क्रमांक लकी आहे, असे सांगायलाही जुमानी विसरले नाहीत.

 कोट्यावधी रुपये खर्च करत संघ मालक खेळाडूंना संघात स्थान देतात. विजयाची जबाबदारी त्यांच्यावर सोपवतात, पण तरीही या होम हवनासाठी अट्टाहास का करतात, हे अनाकलनीय आहे. हार-जीत हा खेळाचा एक अविभाज्य भागच आहे. त्यामुळे ज्यावेळी हे संघ मालक विजयासाठी होम-हवन करण्यापेक्षा खेळाडूंवर विश्वास ठेवतील, तेव्हा खऱ्या अर्थाने क्रिकेट जिंकेल. 

टॅग्स :आयपीएल 2018क्रिकेटकिंग्ज इलेव्हन पंजाबकोलकाता नाईट रायडर्सचेन्नई सुपर किंग्समुंबई इंडियन्सशाहरुख खानप्रीती झिंटा