मुंबई : आयपीएलमधील संघांनी आपल्याला काही किंमत मोजून संघात घेतले तर आपण लीगमध्ये खेळणारच, असं जर काही खेळाडूंना वाटत असेल तर आता तसे होणार नाही. कारण आता आयपीएलच्या प्रशासनाने काही नवीन चाचण्या करायचं ठरवलं आहे. या चाचण्यांमध्ये जर खेळाडू नापास ठरले तर त्यांना आयपीएलमधून डच्चू देण्यात येणार आहे.
खेळाडूंच्या फिटनेससाठी यो-यो टेस्ट घेण्यात येणार आहे. काही वर्षांपूर्वी खेळाडूंच्या फिटनेससाठी ‘बीप’ टेस्ट घेतली जायची. पण यो-यो ही बीपपेक्षा अधिक कठिण टेस्ट आहे. या टेस्टला पास करण्यासाठी 16.1 एवढा स्कोर करणे गरजेचे आहे. पण जर एवढा स्कोर खेळाडूला करता आला नाही, तर त्यांना या लीगमध्ये खेळता येणार नाही.
आयपीएलच्या यंदाच्या हंगामाची सुरुवात 7 एप्रिलला होणार आहे. या हंगामातील पहिला सामना मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्स यांच्यामध्ये खेळवला जाणार आहे. आयपीएल काही दिवसांवर येऊन ठेपली असून सर्वच संघातील खेळाडू तयारीला लागले आहेत. पण आंतरराष्ट्रीय स्तरावर घेण्यात येणारी यो-यो टेस्ट आता खेळाडूंना द्यावी लागणार आहे आणि या स्पर्धेत ते नापास ठरले तर त्यांना लीगमध्ये खेळता येणार नाही.
आयपीएलमधील मुंबई इंडियन्सच्या संघाने पहिल्यांदा ही टेस्ट करायला सुरुवाती केली. त्यानंतर राजस्थान, पंजाब आणि बंगळुरु या संघांनी ही टेस्ट करायचे ठरवले. पण आता कोलकाता, चेन्नई आणि दिल्ली हे संघही खेळाडूंची यो-यो टेस्ट घेणार आहेत.