मुंबई : दोन वर्षांनी आयपीएलमध्ये पुनरागमन करणारा चेन्नई सुपर किंग्ज हा संघ महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली तिसऱ्यांदा आयपीएलचे जेतेपद मिळवण्यासाठी सज्ज झाला आहे. यापूर्वी चेन्नईने 2010 आणि 2011 साली आयपीएलचे जेतेपद पटकावले होते, चार वेळा ते उपविजेते ठरले आहेत. यावर्षी धोनीने आपल्या खास शैलीत संघाची दमदार बांधणी केली आहे. अनुभवी आणि युवा खेळाडूंचा चांगला समन्वय चेन्नईच्या संघात पाहायला मिळतो. आपल्या चाणाक्ष नेतृत्वाच्या जोरावर धोनी चेन्नईतील ' विसल पोडू आर्मी'च्या चाहत्यांची अपेक्षापूर्ती कशी करणार, याकडे साऱ्यांचे लक्ष लागलेले असेल.
बलस्थान : धोनीचे नेतृत्व ही संघासाठी सर्वात जमेची बाजू आहे. कारण आतापर्यंत एक कर्णधार म्हणून धोनीने बऱ्याच रणनिती आखत संघाला विजय मिळवून दिले आहेत. भारतात फिरकी गोलंदाजीला चांगली मदत मिळते. त्यामुळे धोनीने हरभजन सिंग, मिचेल सँटनर, इम्रान ताहिर यांच्यासारखे नावाजलेले फिरकीपटू संघात सामील करून घेतले आहेत. त्याचबरोबर ड्वेन ब्राव्हो, शेन वॉटसन, रवींद्र जडेजा या अष्टपैलूंना संघात स्थान दिले आहे. धोनीसह सुरेश रैना, मुरली विजय, केदार जाधव यांच्यासारखे फलंदाज संघात आहेत.
कच्चेदुवे : चेन्नईची वेगवान गोलंदाजी भक्कम दिसत नाही. लुंगी एनगिडी आणि शार्दुल ठाकूर यांच्याकडे मुख्यत्वे करून वेगवान गोलंदाजीची जबाबदारी असेल. पण या दोघांची कामगिरी चांगली झाली नाही, तर चेन्नईच्या संघापुढे पेच निर्माण होऊ शकतो.
संघ : महेंद्रसिंग धोनी (कर्णधार), सुरेश रैना, रवींद्र जडेजा, फॅफ ड्यू प्लेसिस, हरभजन सिंग, ड्वेन ब्राव्हो, शेन वॉटसन, केदार जाधव, अंबाती रायुडू, इम्रान ताहिर, कर्ण शर्मा, शार्दुल ठाकूर, जगदीशन नारायण, मिचेल सँटनर, दीपक चहार, के.एम. आसिफ, लुंगी एनगिडी, कनिष्क सेठ, ध्रुव शौरी, मुरली विजय, सॅम बिलिंग्स, मार्क वूड, क्षितीज शर्मा, मोनू सिंग, चैतन्य बिश्नोई.