कोलकाता, आयपीएल २०१९ : मुंबई इंडियन्सविरुद्धच्या सामन्यात केकेआरच्या आंद्रे रसेलने तुफानी बॅटींग केली. या सामन्यापूर्वी त्याने संघ व्यवस्थापनावर टीका केली होती. त्यामुळे आजच्या सामन्यात त्याला तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला पाठवले होते. या संधीचा फायदा उचलत रसेलने आपल्यावरील विश्वास सार्थ करून दाखवला.
चांगल्या फॉर्ममध्ये असताना मला सहाव्या क्रमांकावर फलंदाजीला पाठवले जाते, असा रसेलच्या टीकेचा सूर होता. त्यानंतर कोलकाता नाइट रायडर्सच्या संघ व्यवस्थापनाने त्याला तिसऱ्या क्रमांकावर पाठवले. रसेलने या गोष्टीचा फायदा उचलला आणि ४० चेंडूंमध्ये नाबाद ८० धावांची धडाकेबाज खेळी साकारली. त्यामुळेच रसेलने या सामन्यात करून दाखवले, अशी चर्चा चाहत्यांमध्ये होती.
पाहा रसेलच्या सेलिब्रेशनचा व्हिडीओ
आंद्रे रसेलचा केकेआरलाच घरचा अहेर
कोलकाता नाइट रायडर्सने आयपीएलची झोकात सुरुवात केली होती. पण गेल्या काही सामन्यांमध्ये मात्र त्यांना विजय मिळवता आलेला नाही. त्यामुळेच गुणतालिकेत केकेआरची घसरण झाली आहे. त्यामध्येच केकेआरचा स्टार खेळाडू आंद्रे रसेलने संघाला घरचा अहेर देताना कर्णधार दिनेश कार्तिकवर तोफ डागली आहे.
रसेल म्हणाला की, " आमच्या संघाची कामगिरी आयपीएच्या सुरुवातीला चांगली झाली होती. पण काही चुकीच्या निर्णयांमुळे आम्हाला पराभव पाहावे लागत आहेत. संघाने योग्यवेळी उचित निर्णय घेतले नाहीत. चुकीच्यावेळी चुकीच्या गोलंदाजाच्या हाती चेंडू सुपूर्त केले गेले. त्याचबरोबर संघातील चांगल्या फलंदाजांना योग्य संधी दिली नाही. त्यामुळे केकेआरची सध्याची अवस्था चांगली नाही."
मुंबई इंडियन्सविरुद्धच्या सामन्यात कोलकाता नाइट रायडर्सच्या फलंदाजांनी धमाकेदार फलंदाजी केली. मुंबईच्या प्रत्येक गोलंदाजाला केकेआरच्या फलंदाजांना लोटांगण घालायला भाग पाडले. रसेलच्या ४० चेंडूंत नाबाद ८० धावांच्या जोरावर कोलकाताला मुंबईपुढे २३३ धावांचे आव्हान ठेवता आले. रसेलने आपल्या खेळीत सहा चौकार आणि आठ षटकार लगावले.