चेन्नई, आयपीएल 2019 : इंडियन प्रीमिअर लीगमधील चेन्नई सुपर किंग्स हा वयस्कर खेळाडूंचा संघ म्हणून ओळखला जातो. चेन्नईच्या संघातील बरेच खेळाडू तिशीपल्ल्याड आहेत. पण, त्यांची कामगिरी ही अन्य संघातील युवकांना लाजवणारी ठरत आहे. याच खेळाडूंच्या जोरावर चेन्नईने मंगळवारी कोलकाता नाइट रायडर्सवर विजय मिळवत गुणतालिकेत अव्वल स्थान पटकावले. या सामन्यात हरभजन सिंग आणि इम्रान ताहिर यांच्या फिरकीची जादू पुन्हा एकदा पाहायला मिळाली. या दोघांच्या परिपक्वतेबद्दल बोलताना कर्णधार महेंद्रसिंग धोनीनं त्यांची तुलना एका मद्याशी केली आहे.
चेन्नईने मंगळवारी घरच्या प्रेक्षकांसमोर कोलकातावर 7 विकेट राखून विजय मिळवला. या विजयासह चेन्नईने ( 10 गुण) गुणतालिकेत अव्वल स्थान पटकावले आहे. पाहुण्या कोलकाताला 20 षटकांत 9 बाद 108 धावांवर समाधान मानण्यास भाग पाडले. कोलकाताचे सहा फलंदाज अवघ्या 47 धावांवर माघारी परतले होते. आंद्रे रसेलने 44 चेंडूंत नाबाद 50 धावा करताना कोलकाताला समाधानकारक पल्ला गाठून दिला. चेन्नईने हे लक्ष्य 17.2 षटकांत तीन फलंदाजांच्या मोबदल्यात पार केले. फॅफ ड्यू प्लेसिस ( 43*) आणि अंबाती रायुडू ( 21) यांनी चेन्नईचा विजय निश्चित केला. या सामन्यात 38 वर्षीय भज्जीने 15 धावा देत 2 विकेट घेतल्या, तर 40 वर्षीय ताहीरने 21 धावांत दोन फलंदाज माघारी पाठवले. त्यांच्या या कामगिरीचे धोनीने तोंडभरून कौतुक केले.
तो म्हणाला,''वय हे त्यांच्या सोबत आहे. हरभजन व ताहीर हे जुन्या वाईन प्रमाणे आहेत आणि ते वयानुसार अधिक परिपक्व होत चालले आहेत. भज्जीनं मिळालेल्या संधीचं सोनं केलं आहे. ताहीरची गोलंदाजीही उत्तम झाली. त्याचा माझ्यावर पूर्ण विश्वास आहे. आपल्याला कशी गोलंदाजी अपेक्षित आहे हे त्याला सांगितल्यास तो निराश करत नाही. ताहीर हा लेग ब्रेक व गुगलीच नव्हे तर उत्तम फ्लिपर पण टाकतो. ''
चेन्नईतील सामन्यानंतर धोनीचा संघ गुरुवारी राजस्थान रॉयल्सचा सामना करणार आहे. या सामन्यासाठी चेन्नईचा संघ पहाटेच्या विमानानं राजस्थानसाठी रवाना झाला.