चेन्नई, आयपीएल 2019 : इंडियन प्रीमिअर लीगच्या ( आयपीएल ) व्यग्र वेळापत्रकामुळे सहभागी संघातील बऱ्याच खेळाडूंना पुरेशी विश्रांती करण्याची वेळही मिळत नाही. एक सामना झाला की लगेच पुढील लढतीसाठी दुसऱ्या शहराच्या प्रवासाला सुरुवात करावी लागते. त्यामुळे खेळाडूंच्या चेहऱ्यावर थकवा जाणवतो. विश्रांतीसाठी त्यांना फावल्या वेळेचा पुरेपूर वापर करावा लागतो. अशाच वेळेचा सदुपयोग धोनीही करताना दिसत आहे. चेन्नईतील सामन्यानंतर धोनीचा संघ गुरुवारी राजस्थान रॉयल्सचा सामना करणार आहे. या सामन्यासाठी चेन्नईचा संघ पहाटेच्या विमानानं राजस्थानसाठी रवाना झाला. अपूरी झोप पूर्ण करण्यासाठी धोनी चक्क विमानतळावरच आडवा झाला.
31 मार्च ते 9 एप्रिल या कालावधीत चेन्नई सुपर किंग्सने चार सामने खेळले. त्यातील एक सामना मुंबईत झाला, तर उर्वरीत चेन्नईत झाले. एका दिवसांच्या विश्रांतीनंतर चेन्नईला गुरुवारी राजस्थानचा सामना करायचा आहे. वारंवारच्या या प्रवासामुळे खेळाडूंना पुरेशी झोपही मिळत नाही. त्यामुळे विमानतळावर त्यांना झोप काढावी लागत आहे. धोनीनं सोशल मीडियावर पोस्ट केलेल्या फोटोतून हे चित्र समोर आले आहे.