मुंबई इंडियन्सविरुद्धच्या सामन्यात सनरायजर्स हैदराबाद संघाला ज्याची उणीव प्रकर्षानं जाणवली तो प्रमुख गोलंदाज भुवनेश्वर कुमार ( Bhuvneshwar Kumar ) यंदाच्या IPL 2020मधून माघार घेत आहे. नितंबला ( Hip) झालेल्या दुखापतीमुळे त्यानं आयपीएलमधून माघार घेतली आहे. चेन्नई सुपर किंग्सविरुद्ध दुबईत झालेल्या सामन्यात त्याला ही दुखापत झाली होती. त्यामुळे MIविरुद्धच्या सामन्यात त्याला विश्रांती देण्यात आली होती.
ANIशी बोलताना सूत्रांनी सांगितले की,''यंदाच्या आयपीएलमधील पुढील सामन्यात भुवनेश्वर कुमार सहभाग घेऊ शकणार नाही. हिप इंजरीमुळे त्यानं माघार घेण्याचा निर्णय घेतला आहे. सनरायजर्स हैदराबादसाठी हा मोठा धक्काच आहे. संघाचा तो प्रमुख गोलंदाज होता.''
CSKविरुद्धच्या सामन्यात 19व्या षटकात त्याला दुखापत झाली आणि त्याला मैदान सोडावे लागले होते. त्यानं गोलंदाजी करण्याचा प्रयत्न केला, परंतु त्याला वेदना होऊ लागल्या. त्यानंतर फिजिओ त्याला मैदानाबाहेर घेऊन गेले. त्या सामन्यानंतर डेव्हिड वॉर्नर म्हणाला होता की,''त्याची दुखापत किती गंभीर आहे, याची मलाही कल्पना नाही. मला फिजिओशी बोलावं लागेल. तेच याचं उत्तर देऊ शकतील.''
भुवीनं IPL 2020मधील आतापर्यंतच्या चार सामन्यांत 0/25, 0/29, 2/25, 1/20 अशी कामगिरी केली आहे. भुवीनं आयपीएलमध्ये 121 सामन्यांत 136 विकेट्स घेतल्या आहे.