Join us  

IPL 2020: आयपीएल वॉर; जाणून घ्या कोणत्या संघाकडे कशी आहे संधी!

दुबईत होणाऱ्या पहिल्या क्वालिफायरमध्ये मुंबई व दिल्ली एकमेकांविरुद्ध भिडतील.

By ऑनलाइन लोकमत | Published: November 04, 2020 12:50 PM

Open in App

मुंबई : यंदाचे Indian Premier League (IPL 2020) सत्र अत्यंत अटीतटीचे आणि रोमांचक ठरले. अखेरच्या साखळी सामन्यानंतर प्ले ऑफमधील चौथा व अखेरचा संघ निश्चित झाला.   एकीकडे मुंबई विक्रमी पाचव्या विजेतेपदाच्या प्रयत्नात असून दिल्ली व बँगलोर पहिल्या विजेतेपदाच्या प्रयत्नात आहेत. हैदराबादही दुसऱ्या जेतेपदाच्या निर्धाराने खेळतील.

दुबईत होणाऱ्या पहिल्या क्वालिफायरमध्ये मुंबई व दिल्ली एकमेकांविरुद्ध भिडतील. यातील विजेता संघ थेट अंतिम फेरीत जाईल, तर पराभूत संघ एलिमिनेटर फेरीतील विजेत्या संघाविरुद्ध खेळेल. एलिमिनेटर फेरीत हैदराबाद व बँगलोर भिडतील. यांच्यातील विजेता संघ दुसऱ्या क्वलिफायरमध्ये मुंबई वि. दिल्ली यांच्यातील पराभूत संघाविरुद्ध खेळेल. या चारही संघांनी पहिला अडथळा पार करण्यासाठी कंबर कसली आहे. त्यादृष्टीने चारही संघावर टाकलेली ही नजर..मुंबई इंडियन्स :

गेल्या सत्रातील दमदार फॉर्म मुंबईने यंदाही कायम राखला आहे. सलामीला चेन्नई सुपरकिंग्जविरुद्ध झालेला पराभव विसरुन मुंबईने आपला दणका दिला. सलग दुसऱ्यांदा प्ले ऑफमध्ये प्रवेश केलेला मुंबई संघ स्पर्धेतील सर्वात संतुलित संघ आहे. फलंदाज आणि गोलंदाजांनी सांघिक खेळाचे प्रदर्शन केले आहे. क्विंटन डीकॉक, इशान किशन आणि सूर्यकुमार यादव यांनी ४०० हून अधिक धावा काढल्या आहेत. तसेच मुंबईच्या तीन गोलंदाजांनी सर्वाधिक बळी घेणाऱ्यांमध्ये अव्वल दहामध्ये आहेत.दिल्ली कॅपिटल्स :

युवा आणि अनुभवी खेळाडूंचा समावेश असलेला दिल्ली संघ यंदा चांगलाच प्रभावी ठरला. शिखर धवन, अजिंक्य रहाणे, रविचंद्रन अश्विन या अनुभवी खेळाडूंसह पृथ्वी शॉ, श्रेयस अय्यर आणि रिषभ पंत या युवा खेळाडूंचा संघाला मोठा फायदा झाला आहे. एन्रीच नॉर्खिया आणि कागिसो रबाडा हे वेगवान गोलंदाज दिल्लीचे मुख्य अस्त्र ठरले आहेत. यंदा दिल्लीने सहावेळा धावांचा यशस्वी बचाव केला आहे. दिल्लीनेही सलग दुसऱ्यांदा प्ले ऑफ फेरीत प्रवेश केला.सनरायझर्स हैदराबाद :

कमालीचे सातत्य राखलेल्या हैदराबादने  2016 पासून सलग पाचव्यांदा प्ले आॅफ फेरीत धडक मारली. सुरुवातीच्या सामन्यांत पिछाडीवर पडल्यानंतर हैदराबादने जबरदस्त पुनरागमन केले. कर्णधार डेव्हिड वॉर्नरच्या नेतृत्त्वात फलंदाजांनी छाप पाडली. मनीष पांडे, जॉनी बेयरस्टॉ यांनी दमदार फटकेबाजी केली. बेयरस्टॉ दुखापतरस्त झाल्यानंतर त्याच्या जागी आलेल्या रिद्धिमान साहाने शानदार खेळ केला. गोलंदाजीत राशिद खान, संदीप शर्मा आणि टी. नटराजन यांनी दुखापतग्रस्त भुवनेश्वरची कमतरता भासू दिली नाही. तसेच अष्टपैलू जेसन होल्डरमुळे संघाला मजबूती मिळाली आहे.रॉयल चॅलेंजर्स बँगलोर :

स्टार खेळाडूंचा भरणा असलेल्या आरसीबीचा प्रवास चढ उताराचा ठरला. सुरुवातीला दमदार कामगिरी केलेल्या आरसीबीचा आलेख एकाकी उतरला. अखेरचे सलग चार सामने गमावल्यानंतरही आरसीबीने प्ले ऑफमध्ये प्रवेश केला हे विशेष. पहिल्यांदाचा आयपीएल खेळणाऱ्या देवदत्त पडिक्कलने आरसीबीकडून सर्वाधिक धावा फटकावल्या. तसेच सर्वाधिक बळी घेणाऱ्या टॉप ५ गोलंदाजांमध्ये युझवेंद्र चहल आरसीबीचा एकमेव गोलंदाज आहे. याशिवाय कर्णधार विराट कोहली आणि एबी डीव्हिलियर्स या स्टार जोडीनेही मोक्याच्यावेळी संघाला तारले.

टॅग्स :IPL 2020मुंबई इंडियन्ससनरायझर्स हैदराबादरॉयल चॅलेंजर्स बेंगलोर