IPL 2021, CSK vs KKR, Live: क्रिकेट चाहत्यांसाठी आजचा रविवार सार्थकी लागला. कारण अबूधाबीच्या मैदानात आज थरारक सामन्याचा रोमांच क्रिकेट चाहत्यांना अनुभवता आला. अखेरच्या चेंडूपर्यंत रंगलेल्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्जनं (Chennai Super Kings) कोलकाता नाइट रायडर्सविरुद्धवर (Kolkata Knight Riders) २ विकेट्सनं मात केली आहे. केकेआरनं चेन्नईसमोर विजयासाठी १७६ धावांचं आव्हान ठेवलं होतं. प्रत्युत्तरात चेन्नईच्या दिपक चाहरनं अखेरच्या चेंडूवर एक धाव घेत संघाला विजय प्राप्त करुन दिला. अष्टपैलू रविंद्र जडेजा चेन्नईच्या विजयाचा शिल्पकार ठरला. चेन्नईला विजयासाठी १५ चेंडूत ३० धावांची गरज असताना कर्णधार महेंद्रसिंग धोनी बाद झाला आणि सामन्यावर पूर्णपणे केकेआरनं पकड निर्माण केली होती. पण सामन्याच्या १९ व्या षटकात जडेजानं विस्फोटक फलंदाजी करत तब्बल २२ धावा कुटल्या आणि संघाला पुनरागमन करुन दिलं.
अखेरच्या षटकात चेन्नईला विजायासाठी ४ धावांची गरज होती. सुनील नरेनच्या पहिल्याच चेंडूवर सॅम कुरन झेल बाद झाला. तर दुसरा चेंडू निर्धाव आला. तिसऱ्या चेंडूवर शार्दुल ठाकूरनं फाइन लेगच्या दिशेनं नजाकती फटका लगावला आणि तीन धावा केल्या. जडेजा स्ट्राइकवर आला आणि आणखी एक चेंडू निर्धाव आला. दोन चेंडूंवर एक धाव गरजेची असतानाच सुनील नरेन यानं जडेजाला पायचीत केलं. आता अखेरच्या चेंडूवर चेन्नईला विजयासाठी एक धाव आणि सामना सुपर ओव्हरमध्ये नेण्यासाठी कोलकाताला डॉट चेंडूची गरज होती. पण दिपक चाहरनं मिड विकेटच्या दिशेनं फटका लगावत एक धाव पूर्ण केली आणि चेन्नईच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं.
पायातून रक्त वाहत होते, तरीही फॅफ ड्यू प्लेसिस खेळला; प्रत्येक चाहता त्याच्या प्रेमात पडला
चेन्नईकडून सलामीवीर ऋतूराज गायकवाड (४४) आणि फॅफ ड्यू प्लेसिस (४४) यांनी दमदार सुरुवात करुन दिली होती. गायकवाड-ड्यूप्लेसिस यांनी सलामीसाठी ७४ धावांची भागीदारी रचली. ऋतूराज गायकवाड (४४) बाद झाल्यानंतर मोईन अलीनं मैदानात चांगली फटकेबाजी करत संघाच्या धावसंख्येला आकार दिला. पण अंबाती रायुडू (९) मोठी खेळी साकारण्यास अपयशी ठरला. मोईन अलीनं २८ चेंडूत ३२ धावा केल्या. सामन्याच्या १७ व्या षटकात मोईन अली मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात लाँग ऑनवर झेल बाद झाला. तर १८ व्या षटकातील एका चेंडूवर दोन धावा घेण्याच्या प्रयत्नात सुरेश रैना (११) धावचीत झाला. चेन्नईला विजयासाठी १५ चेंडूत ३० धावांची गरज होती याचा दबाव महेंद्रसिंग धोनीवर स्पष्टपणे दिसत होता आणि याचाच फायदा घेत वरुण चक्रवर्तीनं धोनीला क्लिनबोल्ड केलं.
बॉस...याला म्हणतात 'स्मार्ट फिल्डिंग'! सीमारेषेवर फॅफनं टिपला 'फाडू' झेल; पाहा Video
कोलकाताच्या डावात राहुल त्रिपाठी, नितीश राणा आणि दिनेश कार्तिक यांनी दमदार फलंदाजी केली होती. कोलकाताकडून राहुल त्रिपाठीनं याही सामन्यात आपला फॉर्म कायम ठेवत ३३ चेंडूत ४५ धावांची खेळी साकारली. यात १ षटकार आणि चार चौकारांचा समावेश होता. तर नितीश राणानं २७ चेंडूत नाबाद ३७ धावांची खेळी साकारली. अखेरच्या दोन षटकांमध्ये दिनेश कार्तिकनं विस्फोटक फलंदाजी केली. कार्तिकनं ११ चेंडूत २६ धावा केल्या. यात एक षटकार आणि तीन चौकारांचा समावेश होता. चेन्नईकडून शार्दुल ठाकूर यानं ४ षटकांमध्ये २० धावा देत दोन महत्त्वाच्या विकेट्स मिळवल्या. तर फॅफ ड्यू प्लेसिसनं लाँग ऑनवर इयॉन मॉर्गनचा टिपलेला अप्रतिम झेल डोळ्यांचं पारणं फेडणारा ठरला.
'माझी पत्नी मला CSK ची जर्सी घालू देईना', RCB फॅन पत्नीची तक्रार घेऊन पती पोहोचला थेट स्टेडियममध्ये!
सामन्याची नाणेफेक जिंकून कोलकातानं प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला होता. कोलकाताची सुरुवात यावेळी थोडी निराशाजनक झाली. पहिल्याच षटकाच्या अखेरच्या चेंडूवर शुबमन गिल धावचित झाला. चेन्नईच्या अंबाती रायुडूनं डायरेक्ट हिट करत शुबमनला तंबूत धाडलं. त्यानंतर व्यंकटेश अय्यर आणि राहुल त्रिपाठी यांनी धावसंख्येला आकार देण्यास सुरुवातच केली होती. त्यात सामन्याच्या ६ व्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर व्यंकटेश अय्यर (१८) याला शार्दुल ठाकूरनं माघारी धाडलं. यष्टीरक्षक धोनीनं अय्यरचा झेल टिपला. इयॉन मॉर्गन याही सामन्यात आपल्या लौकिकाला साजेशी कामगिरी करू शकला नाही. मॉर्गन(८) मोठा फटका मारण्याच्या नादात लाँग ऑनवर फॅफ ड्यू प्लेसिसला झेल देऊन बसला. धोनीचा हुकमी हक्का रवींद्र जडेजानं मैदानात जम बसवलेल्या राहुल त्रिपाठीला (४५) माघारी धाडलं. तर 'लॉर्ड' शार्दुल ठाकूर यानं केकेआरच्या विस्फोटक आंद्र रसेल(२०) याला बाद केलं. रसेलनं १५ चेंडूत २० धावा केल्या.
Web Title: IPL 2021 CSK vs KKR Live updates chennai super kings won by 2 wickets against kolkata knight riders
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.