IPL 2021, DC vs SRH, Live: सनरायझर्स हैदराबादनंदिल्ली कॅपिटल्ससमोर विजयासाठी १३५ धावांचं आव्हान ठेवलं आहे. दिल्लीच्या वेगवान गोलंदाजांनी आज हैदराबादच्या फलंदाजांना चांगलीच वेसण घातल्याचं पाहायला मिळालं. दिल्लीच्या एन्रीच नॉर्खिया आणि कगिसो रबाडा यांनी आपल्या वेगवान अस्त्रानं हैदराबदाच्या फलंदाजांना चांगलंच जखडून ठेवलं. कगिसो रबाडानं तीन, तर नॉर्खियानं दोन फलंदाजांना बाद केलं. यासोबत अक्षर पटेलनं आपल्या फिरकीची जादू दाखवत २ फलंदाजांना माघारी धाडलं.
सामन्याची नाणेफेक जिंकून हैदराबादनं प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला होता. सामन्याच्या पहिल्याच षटकात एन्रीच नॉर्खिया यानं वायुवेगानं गोलंदाजी करत यंदाच्या आयपीएलमधला सर्वात वेगवान चेंडू टाकला. याच षटकात विस्फोटक डेव्हिड वॉर्नर याला शून्यावर बाद करत नॉर्खियानं हैदराबादला मोठा धक्का दिला. वृद्धीमान सहा आणि केन विल्यमसन यांनी संघाचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला खरा पण चांगली भागीदारी रचण्यात अपयश आलं. हैदराबादकडून आज एकाही फलंदाजाला वैयक्तिक ३० धावा देखील करता आल्या नाहीत.
अब्दुल समद यानं सर्वाधिक २८ धावा केल्या. तर राशिद खान यानं २२ धावांचं योगदान दिलं. केन विल्यमसन आणि वृद्धीमान सहा यांनी प्रत्येकी १८ धावा केल्या.