Join us  

IPL 2021, MI vs CSK, Highlights: मुंबईचं नेमकं कुठं चुकलं? अन् ऋतुराजनं काय हेरलं? मुद्देसूद विश्लेषण वाचा सोप्या शब्दात...

IPL 2021, MI vs CSK, Highlights: सामन्यात दणदणीत सुरुवात करुनही मुंबई इंडियन्सला नेमका कशाचा फटका बसला आणि चेन्नईनं कुठं बाजी मारली हे आपण जाणून घेऊयात...

By ऑनलाइन लोकमत | Published: September 20, 2021 12:18 AM

Open in App

IPL 2021, MI vs CSK, Highlights: आयपीएलच्या १४ व्या सीझनच्या दुसऱ्या टप्प्याला सुरूवात झालीय. पहिलाच सामना गतविजेता मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपरकिंग्ज यांच्यात रंगला. चेन्नईनं यंदा भारतीय खेळपट्ट्यांवरील फॉर्म दुबईतही कायम राखत विजयी कामगिरी केली आहे. मुंबई इंडियन्सवर २० धावांनी मात करत १२ गुणांसह चेन्नई सुपरकिंग्ज संघानं गुणतालिकेत अव्वल स्थान गाठलं आहे. दुबईच्या खेळपट्टीवर झालेल्या या सामन्यात ऋतुराज गायकवाड चेन्नईच्या विजयाचा शिल्पकार ठरला. सामन्यात दणदणीत सुरुवात करुनही मुंबई इंडियन्सला नेमका कशाचा फटका बसला आणि चेन्नईनं कुठं बाजी मारली हे आपण जाणून घेऊयात...

IPL 2021, MI vs CSK, Highlights:

  • दुबईच्या खेळपट्टीवर नाणेफेक जिंकून महेंद्रसिंह धोनीनं प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. खेळपट्टीवर सुरुवातीला स्विंगला मदत मिळणार याची कल्पना असतानाही धोनीनं घेतलेल्या निर्णयानं आश्चर्य व्यक्त केलं गेलं. पण स्विंग जरी प्राप्त होत असला तरी अखेरच्या षटकांमध्ये चेंडू सहज बॅटवर येतो हे माहित होतं आणि मुंबईसारख्या तगड्या संघाविरुद्ध अखेरची पाच षटकं नेहमीच महत्त्वाची ठरतात, असं खुद्द धोनीनं सामन्यानंतरच्या संवादात म्हटलं. त्यामुळे नाणेफेकीचा कौल चेन्नईनं अतिशय विचारपूर्वक घेतला होता हे यातून स्पष्ट होतं.  
  • मुंबईकडून यावेळी कर्णधार रोहित शर्मा आणि अष्टपैलू हार्दिक पंड्या संघाबाहेर होते. नाणेफेकीवेळी रोहित ऐवजी कायरन पोलार्ड मैदानात आल्यानंतर सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला होता. रोहितला इंग्लंड विरुद्धच्या चौथ्या कसोटीत दुखापत झाली होती. पण ती किरकोळ असल्यानं रोहित आजच्या सामन्यात खेळताना दिसेल अशीच दाट शक्यता होती. पण संघ व्यवस्थापनानं रोहितला विश्रांती देण्याचा निर्णय घेतला. त्यासोबत हार्दिक पंड्या देखील आजच्या सामन्यात खेळला नाही. त्यामुळे त्याच्या प्रकृतीबाबत आता चर्चांना उधाण आलं आहे. 
  • १८० ते २०० धावांचं लक्ष्य सहजपणे गाठण्याची ताकद ठेवणाऱ्या मुंबई इंडियन्सच्या संघात आज रोहित शर्मा आणि हार्दिक पंड्या यांची कमतरता स्पष्टपणे दिसून आली. मुंबई इंडियन्सचा संघ गेल्या काही वर्षांपासून साचेबद्ध झालेला आहे. त्यामुळे या दोन महत्त्वाच्या खेळाडूंची अनुपस्थिती संघाला आज भलतीच महागात पडलेली दिसून आली. 
  • प्रथम फलंदाजी स्वीकारणाऱ्या चेन्नई सुपरकिंग्ज संघाला पहिल्याच तीन षटकांमध्ये मोठे धक्के बसले होते. मुंबईचा स्विंग वेगवान गोलंदाज ट्रेंट बोल्टनं आपल्या बोटांची जादू दाखवत एकापेक्षा एक स्विंग चेंडूंचा मारा करण्यास सुरुवात केली होती. यात फॅफ ड्यू प्लेसिसचा पहिला बळी गेला. त्यानंतर अॅडम मिलने यानं मोइल अलीचा बाद केलं आणि बोल्टनं सुरेश रैनाला तंबूत धाडलं. तर अंबाती रायुडू दुखापतग्रस्त होऊन माघारी परतला होता.
  • संघाचे तीन खेळाडू खातंही न उघडता माघारी परतल्याचं ऋतुराज गायकवाडनं पाहिलं आणि चेंडू स्विंग होतोय याचा अंदाज घेत आपल्या फलंदाजीला थोडी मुरड घालत सावध फलंदाजी केली. मैदानात जम बसवण्याची गरज ओळखून त्यानं स्वत:ला वेळ दिला आणि शांतीत क्रांती घडवण्याचा त्याचा मनसुबा अखेरच्या षटकांमध्ये पाहायला मिळाला. 
  • सामन्यात जडेजानं साथ दिल्यानंतर ऋतूराजनं १५ व्या षटकानंतर आपल्या भात्यातून नजाकती आणि तितक्याच निर्भीड फटक्यांचा नजराणा पेश करण्यास सुरुवात केली. जसप्रीत बुमराहसारख्या एक नंबरी यॉर्कर गोलंदाजाच्या घातक यॉर्करवर ऋतुराजनं डीप स्वेअर लेगच्या दिशेनं लगावलेला षटकार त्याच्यातील आत्मविश्वासाची प्रचिती देतो.
  • चेन्नईच्या संघानं दिडशे धावांचा पल्ला पार केल्यानंतर मुंबई इंडियन्सच्या ताफ्यात खेळाडूंच्या माथ्यावरील अस्वस्थता स्पष्ट दिसत होती. इथंच मुंबई इंडियन्समध्ये असलेली आजची रोहित आणि हार्दिकची कमतरता खेळाडूंनाही जाणवत होती याची प्रचिती आली.
  • चेन्नईनं आपल्या गोलंदाजांचा योग्य पद्धतीनं वापर करत मुंबईच्या फलंदाजांना जखडून ठेवण्याचं काम केलं. मुंबईच्या फलंदाजांना मैदानात जम बसवू न देता विजय ठराविक अंतरानं एक एक धक्के देणं सुरु ठेवलं होतं. सौरभ तिवारी यानं खिंड लढवली खरी पण स्ट्राइक रेटच्या बाबतीत त्यानंही कच खाल्ली. याचाही फटका संघाला बसला. 
  • रोहितच्या अनुपस्थितीत कायरल पोलार्डकडे संघाच्या आशा लागून राहिल्या होत्या. त्यामुळे पोलार्डकडून आज कर्णधारी खेळीची अपेक्षा होती. पण धोनीच्या अचूक रणनितीच्या जाळ्यात पोलार्ड अडकला आणि पायचीत होऊन स्वस्तात माघारी परतला. पोलार्ड बाद झाल्यानंतर चेन्नईचं विजयावर जवळपास शिक्कामोर्तब झालं होतं. 

 

टॅग्स :आयपीएल २०२१चेन्नई सुपर किंग्समुंबई इंडियन्स
Open in App