IPL 2021, Ruturaj Gaikwad: आयपीएलच्या १४ व्या सीझनचा दुसरा टप्पा सुरू झाला असून पहिल्याच सामन्यात मराठमोळ्या ऋतूराज गायकवाडनं आपला फॉर्म कायम राखत आज मुंबई इंडियन्स विरुद्धच्या सामन्यात आयपीएलमधील आपली वैयक्तिक सर्वोत्तम नाबाद ८८ धावांची खेळी साकारली आहे. चेन्नईचा संघ अतिशय कठीण परिस्थितीत असताना एकट्या ऋतूराजनं संपूर्ण संघाची जबाबदारी खांद्यावर घेत केलेल्या दमदार फलंदाजीमुळे त्याची आजची खेळी अतिशय महत्त्वाची मानली जात आहे.
ऋतूराजनं मुंबईच्या इंडियन्सच्या गोलंदाजांचा खरपूस समाचार घेत ५८ चेंडूत नाबाद ८८ धावांची खेळी साकारली. यात ४ उत्तुंग षटकार आणि ९ खणखणीत चौकारांचा समावेश आहे. ऋतूराजनं तब्बल १५१ च्या स्ट्राइक रेटनं फलंदाजी केली. अखेरच्या पाच षटकांमध्ये ऋतूराजच्या फलंदाजीला चांगलीच धार आलेली पाहायला मिळाली. त्यात अखेरच्या षटकात यॉर्करकिंग जसप्रीत बुमराहच्या गोलंदाजीवर ऋतूराजनं लगावलेला षटकार डोळ्यांचं पारणं फेडणारा ठरला आहे.
सामन्याच्या अखेरच्या षटकात बुमराह गोलंदाजी करत होता. एक विकेट बुमराहनं मिळवली होती. अखेरच्या चेंडूवर ऋतूराज स्ट्राइकवर होता. सामन्याचा अखेरचा चेंडू बुमराहनं आपलं हुकमी अस्त्र यॉर्कर टाकण्याचा निर्धार केला आणि ऋतूराज गायकवाडनं अत्यंत चलाखीनं त्याचा आधीच अंदाज घेतला की काय असाच निर्भीड फटका ऋतूराजनं लगावलेला पाहायला मिळाला. बुमराहच्या घातक यॉर्कर चेंडूवर ऋतूराजनं अगदी चेंडूवर जात अतिशय नजाकतीनं डीप स्वेअर लेगच्या दिशेनं षटकार ठोकला आणि सर्वांना आश्चर्यचकीत करुन सोडलं. स्टेडियमवर त्यानंतर ऋतुराज...ऋतुराज असा एकच आवाज घुमू लागला होता. ऋतूराजच्या या फटक्याची सोशल मीडियातही जोरदार चर्चा होत असून मराठमोळ्या युवा खेळाडूचं तोंड भरून कौतुक केलं जात आहे.