IPL 2021, Mumbai Indians vs Delhi Capitals Match Highlights : डू ऑर डाय या कात्रित मुंबई इंडियन्स काही पहिल्यांदा फसलेले नाहीत. आयपीएलच्या बहुतांश मोसमात मुंबईनं या कात्रितून स्वतःची सहिसलामत सुटला करून घेतली आहे. याही वेळेत तसाच चमत्कार होईल अशी चाहत्यांची आशा आहे. पण, यावेळचं गणित थोडसं अवघड आहे. चौथ्या जागेसाठी कोलकाता, पंजाब आणि मुंबई हे तिन्ही संघ शर्यतीत आहेत. तिन्ही संघांचे १२ सामन्यानंतर १० गुणच आहेत, परंतु नेट रन रेटमध्ये मुंबईने माती खाल्ली आहे. आजच्या सामन्यातील चुकांमुळे रोहितत शर्माचं ( Rohit Sharma) टेंशन वाढलं आहे.
IPL 2021, MI vs DC Match Highlights :
- मुंबई इंडियन्सच्या ( MI) तगड्या फलंदाजांची आज दिल्ली कॅपिटल्सच्या ( DC) गोलंदाजांसमोर दैना उडाली. अक्षर पटेल व आवेश खान यांनी प्रत्येकी ३ विकेट्स घेत मुंबईला १२९ धावांवर समाधान मानण्यास भाग पाडले. रोहित शर्मा ( ७), क्विंटन डी कॉक ( १९), सौरभ तिवारी ( १५), किरॉन पोलार्ड ( ६) हे अपयशी ठरले. सू
- र्यकुमारला आज मोठी खेळी करून टीकाकारांची तोंड बंद करण्याची संधी होती. त्यानं काही सुरेख फटके मारून त्या दिशेनं सुरुवातही केली, परंतु अक्षरच्या फुल्टॉसवर तो रबाडाच्या हाती झेल देऊन परतला. त्यानं २६ चेंडूंत २ चौकार व २ षटकारासह ३३ धावा केल्या. अक्षर पटेलनं ४ षटकांत २१ धावा देत ३ महत्त्वाच्या विकेट्स घेतल्या. आवेश खाननं १५ धावांत ३ विकेट्स घेतल्या.
- प्रत्युत्तरात दिल्लीचेही तीन फलंदाज झटपट माघारी परतले. शिखर धवनला ( ८ ) घाई नडली अन् किरॉन पोलार्डच्या भन्नाट थ्रोवर तो रन आऊट झाला. पृथ्वी शॉ ( ६) व स्टीव्ह स्मिथ ( ९) यांना अनुक्रमे कृणाल पांड्या व नॅथन कोल्टर नाएल यांनी बाद केले. दिल्लीचे ३ फलंदाज ३० धावांत माघारी परतले होते.
- रिषभ पंतनं झटपट २६ धावा केल्या, परंतु तो जयंत यादवला विकेट देऊन बसला. ट्रेंट बोल्टनं अक्षर पटेलला पायचीत करून दिल्लीचा पाचवा गडी माघारी पाठवला. जसप्रीत बुमराहच्या स्लोव्हर चेंडूवर शिमरोन हेटमायर ( १५) सहज बाद झाला. १५ षटकांत मुंबईच्या ५ बाद ८७ धावा होत्या, तर दिल्लीनं ६ बाद १०० धावा केल्या.
- श्रेयस अय्यर व आर अश्विन ही जोडी खेळपट्टीवर चिकटली आणि त्यांनी मुंबईच्या गोलंदाजांचा चांगला सामना केला. खराब चेंडूवर मोठे फटके मारण्याची संधी या दोघांनीही सोडली नाही. त्यांनी अखेरच्या षटकात ४ धावा असा सामना फिरवला. अश्विननं २० व्या षटकातील पहिलाच चेंडू सीमापार पाठवला अन् ४ विकेट्स राखून विजय मिळवला. अय्यर ३३, तर अश्विन २० धावांवर नाबाद राहिला.
रोहित शर्मा काय म्हणाला?
''या खेळपट्टीवर खेळणं अवघड आहे, याची कल्पना होती. येथे झालेले बरेच सामने आम्ही पाहिले आणि या खेळपट्टीवर धावा करणं तितकं सोपं नव्हतं. त्यामुळे आम्ही आव्हानासाठी तयार होतो आणि आम्हाला ते करणं भाग होतं. आम्ही चांगली फलंदाजी करू शकलो नाही. येथे १७०-१८० धावा होणार नाहीत,हे आम्हाला माहीत होतं, परंतु १४० धावा पुरेशा ठरल्या असत्या. आमच्याकडून भागीदारी झाली नाही. तुमचे फलंदाजच धावा करण्यात अपयशी ठरत असतील, तर विजय मिळवणे अवघड जाते. मधल्या फळीत चांगली कामगिरी झाली नाही आणि त्याचा फटका बसला. आमच्या क्षमतेनुसार खेळलो नाही. आशा करतो की पुढील दोन सामन्यांत ही उणीव भरून काढू.''
Web Title: IPL 2021, MI vs DC Match Highlights : What's going wrong at the Mumbai Indians?, here Rohit Sharma What say
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.