Ravindra Jadeja vs CSK : इंडियन प्रीमिअर लीगमधील सर्वात यशस्वी संघापैकी एक असलेल्या चेन्नई सुपर किंग्सच्या ( CSK) ताफ्यात नेमकं काय चाललंय याचा अंदाज बांधणे अवघड झालंय... आयपीएल २०२०मध्ये सुरेश रैना ( Suresh Raina)विरुद्ध CSK या नाट्यमय घडामोडी घडल्या आणि त्यानंतर आयपीएल २०२१मध्ये चेन्नईने अलगद रैनाला दूर लोटले. आता आयपीएल २०२२मध्ये CSK vs Ravindra Jadeja हा वाद रंगताना दिसतोय...
इंडियन प्रीमिअर लीगच्या १५व्या पर्वाला सुरुवात होण्यापूर्वी महेंद्रसिंग धोनी ( MS Dhoni) कर्णधारपद सोडतो काय आणि रवींद्र जडेजाकडे ती जबाबदारी सोपवली जाते काय... पण, ८ सामन्यांत केवळ दोन विजय मिळवल्यानंतर जडेजाची उचलबांगडी होते आणि सूत्रं पुन्हा धोनीच्या हाती सोपवली जातात. CSK व्यवस्थापनाने ज्या पद्धतीने हे प्रकरण हाताळले, त्याने रवींद्र जडेजा प्रचंड नाराज असल्याचे वृत्त समोर येत आहे. कर्णधारपद गेल्यानंतर जडेला दुखापतीमुळे बाकावर बसला आणि नंतर आयपीएल २०२२मधून माघार घेत असल्याचा निर्णय घेतला. कर्णधारपदावरून हटवल्यामुळे जडेजा नाराज असून त्याचे व CSK च्या नात्याची घट्ट नाळ तुटणार असल्याची चर्चा आता सुरू झाली आहे.
रवींद्र जडेजा व चेन्नई सुपर किंग्स यांनी सोशल मीडियावर एकमेकांना अनफॉलो केलेच आहे. त्यात आता पुढील आयपीएलपूर्वी ही दोघं मोठा निर्णय घेण्याची शक्यता आहे. InsideSport.IN ने दिलेल्या वृत्तानुसार जडेजाच्या निकटवर्तीयांनी सांगितले की, रवींद्र जडेजा खूप दुःखी आहे आणि त्याला प्रचंड वेदना झाल्या आहेत. कर्णधारपदाचे प्रकरण आणखी चांगल्यापद्धतीने हाताळले जायला हवे होते. सर्वकाही झटकन झाले. असं घडल्यानंतर कोणतीही व्यक्ती दुःखी होईल. जडेजाच्या माघारीवर मी अधिक बोलणार नाही. तो दुखापतग्रस्त आहे, परंतु त्याची दुखापत किती गंभीर आहे, याची मलाही कल्पना नाही.
दुसरीकडे, CSK चे सीईओ काशी विश्वनाथन यांनी मात्र जडेजा हा सीएसकेच्या प्रत्येक योजनेचा भाग असल्याचे स्पष्ट केले. ते म्हणाले,‘ सोशल मीडियावर मी काहीही फॉलो करीत नाही. तेथे काय सुरू आहे याची मला माहिती नसते. व्यवस्थापनाकडून काहीही अडचण नाही हे मी स्पष्ट करू इच्छितो. जडेजा हा सीएसकेच्या भविष्यातील योजनेत सहभागी असेल.’
जडेजाच्या दुखापतीबाबत विश्वनाथन म्हणाले, ‘आरसीबीविरुद्ध लढतीदरम्यान जडेजाला बरगड्यांची दुखापत झाली होती. त्यामुळे दिल्लीविरुद्ध तो खेळू शकला नव्हता. वैद्यकीय सल्ल्यानुसार तो आयपीएलमधील पुढील सामने खेळू शकणार नाही, हे स्पष्ट झाले. तो घरी परत जात असून आम्ही त्याला रिलिज केले आहे.’ वर्षभरापासून तो सज्ज नव्हता. आयपीएल सुरू होण्या आधीच धोनीचा उत्तराधिकारी म्हणून जडेजाकडे नेतृत्व सोपविण्यात आले.