अहमदाबाद : दोन महिन्यांपासून रंगलेल्या आयपीएलच्या १५ व्या सत्रातील अंतिम सामन्याचा थरार अनुभवण्यासाठी क्रिकेटविश्व सज्ज झाले आहे. गुजरात टायटन्स आणि राजस्थान रॉयल्स यांनी दमदार खेळाचे प्रदर्शन करत अंतिम फेरीत धडक दिली. गुजरातने पहिल्या क्वालिफायरमध्ये राजस्थानला धक्का देत थेट अंतिम फेरीत प्रवेश केला, तर राजस्थानने दुसऱ्या क्वालिफायर लढतीत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचे (आरसीबी) आव्हान परतवून अंतिम फेरी गाठली.
क्वालिफायर लढतीत राजस्थानला नमवल्याने गुजरातचे पारडे अंतिम सामन्यात काहीसे वरचढ असेल. शिवाय अंतिम सामना जगातील सर्वात मोठे क्रिकेट स्टेडियम आणि गुजरात संघासाठी घरचे मैदान असलेल्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणार असल्याने गुजरात संघाला घरच्या पाठिराख्यांचा मोठा पाठिंबाही मिळेल. त्यामुळे मानसिकरीत्या गुजरात संघ एक पाऊल पुढे राहील. राजस्थानसाठी यंदा जोस बटलर हुकमी एक्का ठरला आहे. यंदाच्या सत्रात त्याने तब्बल ४ शतके काढून सर्वच गोलंदाजांची बेदम धुलाई केली आहे. त्यामुळेच गुजरातचे पहिले लक्ष्य बटलरला लवकरात लवकर बाद करण्याचे असेल.
जिंकणार फक्त वॉर्नसाठी!
ऑस्टेलियाचा दिग्गज लेगस्पिनर शेन वॉर्न याचे ४ मार्च रोजी अचानकपणे निधन झाले. त्याच्या निधनानंतर क्रिकेटविश्व हळहळले. आयपीएलच्या पहिल्या सत्रात कोणताही स्टार खेळाडू संघात नसताना शेन वॉर्नने जबरदस्त नेतृत्व करताना संघाला विजेतेपद पटकावून दिले होते. त्यानंतर पहिल्यांदाच राजस्थानने अंतिम फेरी गाठली. त्यामुळेच यंदा जेतेपद पटकावणे हीच वॉर्नसाठी खरी श्रद्धांजली ठरेल, असे वक्तव्य राजस्थानचा कर्णधार संजू सॅमसनने केले.
बॉलिवूड तडका आणि फटाक्यांची आतषबाजी
आयपीएलमध्ये चार वर्षांनी पहिल्यांदाच समारोप सोहळा होणार आहे. रविवारी होणाऱ्या अंतिम सामन्याआधी सुमारे ५० मिनिटांचा रंगतदार समारोप सोहळा होईल. यामध्ये बॉलिवूड स्टार रणवीर सिंग आणि ऑस्कर विजेता संगीतकार-गायक ए.आर. रेहमान यांच्या धमाकेदार कलाकारीने या समारोप सोहळ्याची रंगत वाढणार आहे. मोठ्या कालावधीनंतर होत असलेल्या समारोप सोहळ्याची क्रिकेट चाहत्यांमध्ये उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.
विशेष म्हणजे यादरम्यान भारतीय क्रिकेटच्या आतापर्यंतच्या प्रवासावर प्रकाश टाकण्यात येणार असल्याची माहिती आयोजकांकडून मिळाली. केवळ भारतीय क्रिकेटच नाही, तर भारताच्या ७५व्या स्वातंत्र्य वर्षानिमित्त विशेष जल्लोषही होणार आहे. समारोप सोहळा सुमारे ५० मिनिटे रंगणार असून, यानंतर रात्री ८ वाजेपासून अंतिम सामन्याला सुरुवात होईल.
Web Title: IPL 2022 Final: Gujarat Titans v Rajasthan Royals; Who will win the IPL Final match today?
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.