IPL 2022 Mumbai Indians vs Delhi Capitals Live Updates : मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात वानखेडे स्टेडियमवर सुरू असलेला सामना चुरशीचा होतोय. रोहित शर्मला स्वस्तात बाद केल्यानंतर इशान किशन व डेवॉल्ड ब्रेव्हिस यांनी अर्धशतकी भागीदारी करून मुंबईला रुळावर आणले. पण, कुलदीप यादव व शार्दूल ठाकूरने MI ला धक्के दिले. शार्दूलच्या गोलंदाजीवर मुंबईला आणखी एक झटका बसला असता, परंतु DC चा कर्णधार रिषभ पंतने ( Rishabh Pant) DRS घेण्यास नकार दिला आणि त्या निर्णयाचा दिल्लीला फटका बसताना दिसतोय.
दिल्ली कॅपिटल्सच्या गोलंदाजांकडूनही जबरदस्त प्रतिहल्ला झाला. त्यांनी टिच्चून मारा करताना पहिल्या ६ षटकांत केवळ २७ धावा दिल्या आणि रोहित शर्माची विकेटही मिळवली. रोहित १३ चेंडूंत २ धावा करून एनरिच नॉर्खियाच्या गोलंदाजीवर शार्दूल ठाकूरच्या हाती झेल देऊन बसला. डेवॉल्ड ब्रेव्हिस व इशान MIच्या डावाला आकार देत होते. २ धावांवर असताना कुलदीप यादवच्या गोलंदाजीवर ब्रेव्हिसने खणखणीत फटका मारला आणि शार्दूरने सीमारेषेवर कॅच घेण्याचा पुर्ण प्रयत्न केला. पण, मुंबईला षटकार मिळाला. इशान व ब्रेव्हिस यांनी ३७ चेंडूंत ५१ धावांची भागीदारी केली. ( पाहा IPL 2022 - MI vs DC सामन्याचे लाईव्ह स्कोअरकार्ड )
१०व्या षटकात कुलदीप यादवच्या गोलंदाजीवर इशानने १८ धावा चोपल्या, तरीही रिषभने १२वे षटक त्याला दिले. रिषभचा हा विश्वास कुलदीपने सार्थ ठरवला आणि इशान ३५ चेंडूंत ३ चौकार व ४ षटकारांसह ४८ धावांवर झेलबाद झाला. त्याच षटकात ब्रेव्हिस ( २५) झेल उडाला होता आणि रिषभ मेरा कॅच है म्हणत पुढे आला, परंतु त्याच्याकडून हा झेल सुटला. कुलदीपने ४ षटकांत ३३ धावांत १ विकेट घेतली.
१५व्या षटकात शार्दूलने DCला ब्रेव्हिसची ( ३७) विकेट मिळवून दिली. शार्दूलने टाकलेल्या बाहेर जाणाऱ्या चेंडूला फटका मारण्याच्या प्रयत्नात ब्रेव्हिस त्रिफळाचीत झाला. त्याच षटकात टीम डेव्हिड ( ०) झेलबाद होता, परंतु रिषभने DRS घेतला नाही. चेंडू डेव्हिडच्या बॅटला टच झाल्याचे अल्ट्राएजमध्ये दिसले आणि DC च्या डगआऊटमध्ये साऱ्यांनी डोक्यावर हात मारला. पुढच्याच चेंडूवर डेव्हिडने षटकार खेचला.
दिल्ली कॅपिटल्सचा संघ दडपणाखाली खेळला. जसप्रीत बुमराह ( Jasprit Bumrah) आज स्टार ठरला. बुमराहने ४ षटकांत २५ धावांत ३ विकेट्स घेतल्या. डेव्हिड वॉर्नर ( ५), मिचेल मार्श ( ०), पृथ्वी शॉ ( २४) आणि सर्फराज खान ( १०) हे फलंदाज माघारी परतल्याने दिल्लीच्या ४ बाद ५० धावा धाल्या होत्या. रोव्हमन पॉवेल ( ४३) व रिषभ पंत ( ३९) यांनी पाचव्या विकेटसाठी ७५ धावा जोडल्या. . दिल्लीने ७ बाद १५९ धावा केल्या. अक्षरने नाबाद १९ धावा केल्या. मयांक मार्कंडेने ४ षटकांत २६ धावांत १ विकेट घेतली, तर हृतिक शोकिनने ४ षटकांत ३४ धावा दिल्या. रमणदीप सिंगने २ षटकांत २९ धावांत २ विकेट्स घेतल्या. डॅनिएल सॅम्सला एक विकेट मिळाली.