पुणे : आयपीएलमध्ये बुधवारी मुंबई इंडियन्सच्या पराभवाची हॅटटिक झाली. केकेआरने १६ षटकांत पाच गड्यांनी विजय मिळविल्याचे श्रेय श्रेयस अय्यर आणि पॅट कमिन्स यांच्या दिमाखदार खेळीला गेले.
कमिन्सने १५ चेंडूंमध्ये तब्बल ५६ धावा करून नवा विक्रम रचला आहे. तो आयपीएलच्या इतिहासात सर्वांत वेगवान आणि कमी चेंडूंमध्ये अर्धशतक झळकावणारा लोकेश राहुलनंतर दुसरा खेळाडू ठरला. राहुलने २०१८ मध्ये दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध १४ चेंडूंमध्ये अर्धशतक ठोकले होते. त्याच्या या कामगिरीला पाहून मुंबईचा कर्णधार रोहित शर्मा यानेदेखील आश्चर्य व्यक्त केले. विशेष म्हणजे या कामगिरीचे स्वत: कमिन्सलाही आश्चर्य वाटत आहे. त्याने सहा षटकार आणि चार चौकार लगावले. त्याच्या या खेळामुळे काही क्षणात सामना केकेआरच्या बाजूने फिरला. रसेल बाद झाल्यानंतर आलेल्या कमिन्सने पूर्ण सामनाच फिरवून टाकला. मैदावर येताच त्याने चौकार आणि षटकार यांचा अक्षरश: पाऊस पाडला. कर्णधार श्रेयस अय्यरने आपण नियोजित रणनीतीप्रमाणे खेळलो आणि विजय मिळावला. कमिन्सने अपेक्षेपेक्षा आधीच संघाला विजय मिळवून दिल्याचे सांगितले.
या खेळीचे आपल्यालाच आश्चर्य वाटल्याचे कमिन्सने कबूल कले. सामनावीर पुरस्कार पटकावल्यानंतर तो म्हणाला, ‘या खेळीमुळे मीच सर्वाधिक आश्चर्यचकित झालो. या धावा माझ्या हातून होऊन गेल्या. मी फार विचार करीत नव्हतो. चेंडू हवेत तरंगतोय असे मला वाटत होते. सीमारेषा लहान असणाऱ्या भागांमध्ये फटकेबाजी करण्याचा माझा प्रयत्न होता. संघाने माझ्यावर विश्वास ठेवून मला संधी दिली त्यासाठी मी आभारी आहे.’