IPL 2022 Playoffs qualification scenario: पंजाब किंग्सने ( Punjab Kings) आयपीएल २०२२च्या आजच्या लढतीत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला ( RCB) चारी मुंड्या चीत केले. पंजाबने हा विजय मिळवून स्वतःला प्ले ऑफच्या शर्यतीत कायम राखलेय खरे, परंतु RCBने लाजीरवाण्या पराभवासोबत स्वतःच्या पायावर धोंडा मारून घेतला आहे. गुजरात टायटन्सने प्ले ऑफमधील स्थान पक्के केले आहे, तर मुंबई इंडियन्स व चेन्नई सुपर किंग्स यांचे आव्हान संपुष्टात आले आहे. अशात तीन जागांसाठी ७ संघांमध्ये चुरस आहे आणि त्यात RCB आघाडीवर होते. मात्र, आजच्या लाजीरवाण्या पराभवाचा त्यांना खूप मोठा फटका बसला आहे.
प्रथम फलंदाजी करताना पंजाब किंग्सने ९ बाद २०९ धावा केल्या. जॉनी बेअरस्टो २९ चेंडूंत ४ चौकार व ७ षटकारांसह ६६ धावांवर माघारी परतला. लिएम लिव्हिंगस्टोनने ४२ चेंडूंत ५ चौकार व ४ षटकारांसह ७० धावा चोपल्या. पंजाबने ९ बाद २०९ धावा कुटल्या. हर्षल पटेलने ३४ धावांत ४ विकेट्स घेतल्या. वनिंदू हसरंगाने १५ धावांत २ विकेट्स घेत चांगली गोलंदाजी केली. ग्लेन मॅक्सवेल व शाहबाद अहमद यांना प्रत्येकी १ विकेट मिळाली. प्रत्युत्तरात, बंगळुरूकडून ग्लेन मॅक्सवेल ( ३६) हा सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला. विराट कोहली २० व रजत पाटीलार २६ धावांवर बाद झाले. रिषी धवन ( २-३६), राहुल चहर ( २-३७) यांनी प्रत्येकी दोन विकेट्स गेतल्या. कागिसो रबाडाने ( ३-२१) महत्त्वाच्या विकेट्स घेतल्या. हरप्रीत ब्रार व अर्षदीपच्या नावावर एक विकेट राहिली. बंगळुरूला ९ बाद १५५ धावा करता आल्या आणि पंजाबने ५४ धावांनी सामना जिंकला.
या सामन्याआधी RCBचा नेट रन रेट हा -०.११५ असा होता, तर पंजाबचा -०.२३१ असा होता. पण, लढतीनंतर RCBचा नेट रन रेट खूप गडगडला. त्यांचा रन रेट -०.३२३ असा झाला आहे आणि याचा फटका त्यांना पुढे बसू शकतो. आता त्यांना अखेरच्या साखळी सामन्यात गुजरात टायटन्सवर काही करून विजय मिळवावा लागेल. तसे न झाल्यास १४ सामन्यांअखेरीस त्यांच्या खात्यात १४ गुण राहतील आणि तेव्हा नेट रन रेट त्यांचा घात करेल. गुणतालिकेत अव्वल सहा संघांमध्ये नकारात्मक नेट रन रेट असलेला RCB हा एकमेव संघ आहे.