Shardul Thakur, KKR Captain: IPL 2023 सुरू होण्यासाठी अवघे काहीच दिवस शिल्लक आहेत. 31 मार्चला गुजरात टायटन्स आणि चेन्नई सुपर किंग्स या दोन संघांमध्ये या हंगामाचा सलामीचा सामना रंगणार आहे. यंदाच्या IPL आधी अनेक संघांना खेळाडूंच्या दुखापतींचा फटका बसल्याचे दिसत आहे. मुंबई इंडियन्स स्टार गोलंदाज जसप्रीत बुमराह सध्या जायबंदी आहे. आणखीही काही संघाचे खेळाडू दुखापतग्रस्त आहेत. दिल्लीचा कर्णधार रिषभ पंत जायबंदी असल्याने डेव्हिड वॉर्नर संघाचे नेतृत्व ठरणार आहे. दुसरीकडे KKR चा कर्णधार श्रेयस अय्यर देखील दुखापतग्रस्त आहे. त्यामुळे कोलकाताचा संघ कुणाला नेतृत्वाची संधी देणार यावर चर्चा सुरू आहे. तशातच, भारताचा स्टार ऑलराऊंडर शार्दूल ठाकूर याच्यासह ३ बड्या परदेशी खेळाडूंच्या नावांची या जबाबदारीसाठी चर्चा आहे.
श्रेयस अय्यरला नक्की काय झालं?
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील कसोटी मालिकेदरम्यान श्रेयस अय्यर दुखापतीचा बळी ठरला होता. यानंतर अय्यरवर शस्त्रक्रिया करावी लागू शकते आणि तो बराच काळ मैदानाबाहेर राहणार असल्याच्या बातम्या आल्या होत्या. मात्र, त्यानंतर मीडिया रिपोर्ट्समध्ये श्रेयस अय्यरची दुखापत पूर्ण होणार नसल्याचे सांगण्यात आले. त्याचवेळी अय्यरच्या दुखापतीमुळे केकेआरसमोर कर्णधारपदाचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. आयपीएल सुरू होण्यास अवघे काही दिवस उरले असून त्यांच्या कर्णधाराची घोषणा अद्याप झालेली नाही.
कोणकोणत्या नावांमध्ये स्पर्धा?
मीडिया रिपोर्ट्सनुसार, कर्णधारपदासाठी काही नावे पुढे केली जात आहेत. त्यात पहिला म्हणजे मराठमोळा वेगवान गोलंदाज शार्दूल ठाकूर. याशिवाय तीन बडे परदेशी खेळाडूही या स्पर्धेत आहेत असे बोलले जात आहे. त्यापैकी एक म्हणजे सुनील नरेन. तो दीर्घकाळ संघाशी जोडला गेला आहे. दुसरा म्हणजे आंद्रे रसेल. रसेल हा संघाचा कणा आहे असे म्हटले तर चुकीचे ठरणार नाही. आणि तिसरा पर्याय म्हणजे अत्यंत अनुभवी शाकीब अल हसन. शाकिबने अनेक वर्ष बांगलादेशचे कर्णधारपद भूषवले आहे. पण बांगलादेश क्रिकेट बोर्डाच्या ना-हकरत प्रमाणापत्रामुळे त्याचा हंगामातील सहभाग अद्याप निश्चित नाहीये.
कर्णधाराची घोषणा लवकरच होणार
एका सूत्राने टाईम्स ऑफ इंडियाला सांगितले की, "एक-दोन दिवसात, KKR त्यांच्या नवीन कर्णधाराची घोषणा करेल. एक मोठा कार्यक्रम आयोजित केला जाईल, ज्यामध्ये बॉलीवूड सुपरस्टार शाहरुख खान आणि परदेशी पॉप स्टार देखील उपस्थित असतील." अहवालानुसार, KKR व्यवस्थापन शार्दुल ठाकूरला कर्णधार बनवू इच्छित आहे कारण यामुळे भारतीय खेळाडूंमधील संवाद सुधारेल. कोलकाता नाइट रायडर्स त्यांच्या IPL 2023 च्या मोहिमेची सुरुवात पंजाब किंग्ज विरुद्धच्या सामन्याने करेल. उभय संघांमधील सामना 1 एप्रिल रोजी दुपारी सुरू होईल.
Web Title: IPL 2023 Marathi cricketer Shardul Thakur with these 3 foreign players in the race for KKR Captaincy in upcoming season see names options
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.