IPL 2024 : इंडियन प्रीमिअर लीग २०२४ च्या साखळी फेरीचे शेवटचे ८ सामने शिल्लक आहेत. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने सलग पाच विजय मिळवून प्ले ऑफच्या शर्यतीत स्वतःला कायम राखले आहे. RCBने ( ०.३७८) सलग १२ गुणांसह पाचव्या क्रमांकावर झेप घेतली आहे. त्यामुळे CSK विरुद्धचा १८ मे रोजी होणारा सामना हा त्यांच्यासाठी नॉक आऊट असेल. तो सामना जिंकूनही RCB चे स्थान पक्के नसेल. त्यांना CSK ( ०.५२८) पेक्षा चांगला नेट रन रेट ठेवयाचा असेल तर त्यांना हा सामना १८ धावांनी किंवा १८ षटकांच्या आत जिंकावा लागेल. त्याचवेळी जर सनरायझर्स हैदराबाद व लखनौ सुपर जायंट्स यांनी त्यांचे उर्वरित दोन्ही सामने जिंकले, तरी RCB चे आव्हान संपेल.
प्ले ऑफच्या दिशेने कूच करणाऱ्या RCB ला शेवटच्या आणि महत्त्वाच्या साखळी सामन्यापूर्वी मोठे धक्के सहन करावे लागले आहेत. लिएम लिव्हिंगस्टन व जॉस बटलर यांच्यापाठोपाठ इंग्लंडच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप संघातील खेळाडू विल जॅक्स व रिले टॉप्ली ( Will Jacks & Reece Topley ) हे मायदेशी परतले आहेत. राष्ट्रीय कर्तव्यासाठी या दोघांनी आयपीएल २०२४ मधून माघार घेतली आहे. RCB ने सोशल मीडियावरून हे अपडेट्स दिले आहेत. RCB च्या पुनरागमनात विल जॅक्सने मोठी भूमिका बजावली आहे. त्याने ८ सामन्यांत १७५.५७च्या स्ट्राईक रेटने १ शतक व १ अर्धशतकांसह २३० धावा केल्या आहेत. त्यात १६ चौकार व १८ षटकारांचा समावेश आहे. त्याच्या नावावर दोन विकेट्सही आहेत. टॉप्लीने ४ सामन्यांत ४ विकेट्स घेतल्या आहेत. या दोघांचे CSK विरुद्धच्या सामन्यात नसणे RCB साठी जड जाऊ शकते.