Virat Kohli Fan, RCB: विराट कोहलीच्या दमदार अर्धशतकाच्या जोरावर सोमवारी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाने अटीतटीच्या लढतीत पंजाब किंग्जला धोबीपछाड दिला. शिखर धवनचे अर्धशतक हुकले पण त्याच्या सर्वाधिक ४५ धावांच्या खेळीच्या जोरावर पंजाबने प्रथम फलंदाजी करताना १७६ धावा केल्या होत्या. या आव्हानाचा पाठलाग करताना विराटने ४९ चेंडूत दमदार ७७ धावा कुटल्या. त्यामुळे RCBने चार चेंडू आणि चार गडी राखून सामना जिंकला. आपल्या तडाखेबंद फलंदाजीसाठी विराट कोहलीला सामनावीराचा किताब देण्यात आला. पण त्याच्या एका फॅनला मात्र या सामन्यात केलेल्या एका कृत्याची वाईट किंमत चुकवावी लागली.
सामन्यादरम्यान विराट कोहली फलंदाजी करत असताना एक चाहता सुरक्षाकडे भेदून त्याच्यापर्यंत पोहोचला. त्याने विराट कोहलीच्या पायाला स्पर्श केला. पण या कृत्यानंतर विराटच्या चाहत्याला या गोष्टीची फार मोठी किंमत चुकवावी लागली. विराट कोहलीच्या पायाला स्पर्श केल्यानंतर सुरक्षारक्षकांनी फॅनला तेथून ओढत मैदानाबाहेर नेले. त्याने चाहत्याला बेदम मारहाण केली. ५ ते ७ जण विराटच्या फॅनला धक्काबुक्की आणि लाथाबुक्क्यांनी तुडवत असतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरही चर्चेचा विषय ठरताना दिसतोय. पाहा तो व्हिडीओ-
दरम्यान, बरेच दिवस क्रिकेटपासून लांब असलेले दोन दिग्गज या सामन्यात चमकले. पंजाबची प्रथम फलंदाजी सुरु असताना शिखर धवनने सर्वाधिक ४५ धावा केल्या. जितेश शर्मा (२७) आणि प्रभसिमरन सिंग (२५) यांनीही चांगली झुंज दिली. त्यामुळे RCBला १७७ धावांचे आव्हान मिळाले. बंगळुरूकडून विराट कोहलीने सलामीला येत डावाची सुत्रे आपल्या हाती घेतली. त्याने तुफान फटकेबाजी करत संघाच्या धावसंख्येला दिशा दिली. तर शेवटच्या टप्प्यात दिनेश कार्तिकने फिनिशरची भूमिका चोख बजावली. १० चेंडूत नाबाद २८ धावा करत त्याने RCB महत्त्वपूर्ण विजय मिळवून दिला.