इंडियन प्रीमिअर लीगच्या ( आयपीएल 2020) 13 व्या मोसमासाठीची आज महत्त्वाची बैठक पार पडली. त्यात आयपीएलची तारीख ठरवरण्यात आली असून डबल हेडर आणि सामन्यांची वेळही ठरवण्यात आली. ही स्पर्धा संयुक्त अरब अमिराती ( यूएई) येथे होणार असल्याचे भारतीय क्रिकेट नियामक मंडळानं ( बीसीसीआय) आधीच जाहीर केले होते. ही स्पर्धा 19 सप्टेंबरला सुरू होणार होती, परंतु अंतिम सामन्याच्या तारखेवरून थोडा गोंधळ होता तोही आज सुटला. सुरुवातीला या लीगला केंद्र सरकारनं परवानगी दिली असल्याचे सोशल मीडियावर व्हायरल झालं होतं. पण, आयपीएलच्या ट्विटनं अजूनही मान्यता मिळालेली नाही, हे स्पष्ट होत आहे.
गव्हर्निंग काऊंसिलच्या आज झालेल्या बैठकीत 19 सप्टेंबरला ही स्पर्धा सुरू होणार असून 10 नोव्हेंबरला अंतिम सामना रंगणार असल्याचे स्पष्ट झाले. 53 दिवसांच्या कालावधीत 10 डबल हेडर सामने रंगणार असून भारतीय वेळेनुसार सायंकाळी 7.30 वाजता सामन्यांना सुरुवात होणार आहे. प्रत्येक संघ 24 खेळाडूंनाच घेऊन जाणार आहे.
''आयपीएलचा सामना 30 मिनिटे आधी खेळवण्याचे ठरले आहे आणि त्यामुळे सामने 7.30 वाजता खेळवण्यात येतील. सामना पाहण्यासाठी प्रेक्षक असते तर खेळाडूंचा उत्साह वाढला असता, परंतु खेळाडूंची सुरक्षितता हे आमचे प्राधान्य आहे. त्यामुळे या गोष्टींवर वेळ आल्यावर अमिराती क्रिकेट बोर्डाशी चर्चा केली जाईल,''असेही अधिकाऱ्यानं सांगितले. येत्या आठवडाभरात केंद्र सरकारकडूनही मिळण्याची शक्यता आहे.