Join us  

आयपीएलचे वेळापत्रक आज जाहीर होणार;चाहत्यांची उत्सुकता शिगेला

१४ दिवस शिल्लक

By ऑनलाइन लोकमत | Published: September 06, 2020 1:40 AM

Open in App

नवी दिल्ली : ‘इंडियन प्रीमियर लीगच्या १३ व्या पर्वाचे वेळापत्रक आज रविवारी जाहीर केले जाईल,’ अशी माहिती आयपीएल चेअरमन ब्रिजेश पटेल यांनी शनिवारी दिली. १९ सप्टेंबर ते १० नोव्हेंबर या कालावधीत यूएईत रंगणारी ही लीग सुरू होण्यास आता केवळ १४ दिवस शिल्लक आहेत.

कोरोनामुळे आठही संघांच्या समस्यात भर पडल्यामुळे चाहत्यांना वेळापत्रकाची उत्सुकता आहे. दुबई, अबूधाबी आणि शारजा येथे सामन्यांचा थरार रंगणार अ ाहे. सर्व संघ स्पर्धास्थळी दाखल झाले असून नियमावलीनुसार विलगीकरण कालावधी पूर्ण करीत सरावाला लागले आहेत.

चेन्नई सुपरकिंग्सने कोरोनाच्या तीन चाचण्यांचा टप्पा यशस्वीपणे पूर्ण केल्यानंतर शुक्रवारी सराव सुरू केला. या संघातील दोन खेळाडूंसह १३ सदस्य पॉझिटिव्ह आढळल्याने खळबळ माजली होती. त्या सर्वांना संघापासून वेगळे ठेवण्यात आले आहे. दरम्यान सुरेश रैना आणि हरभजनसिंग या दोन अनुभवी खेळाडूंनी वैयक्तिक कारणास्तव माघार घेतल्यामुळे सीएसकेला पाठोपाठ धक्के बसले. या आधी सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार वेळापत्रक ४ सप्टेबर रोजी जाहीर होणार होते.

बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली यांनीही वेळापत्रक तयार असून ते शुक्रवारी जाहीर होईल, असे म्हटले होते. मात्र ही प्रतीक्षा दोन दिवसानी वाढली. सध्याचा विजेता मुंबई इंडियन्स आणि उपविजेता चेन्नई सुपरकिंग्स यांच्यात १९ सप्टेबर रोजी सलामीचा सामना खेळला जाईल, असे समजते. (वृत्तसंस्था)

चेन्नई सुपर किंग्स संघ उतरला मैदानावर

कोरोनाची टेस्ट पॉझिटिव्ह आलेल्या दीपक चाहर आणि ऋतुराज गायकवाड या दोघांना वगळता कर्णधार महेंद्रसिंग धोनी आणि चेन्नई सुपर किंग्सच्या अन्य खेळाडूंनी शुक्रवारी रात्री सराव केला. या सर्वांची कोरोनाची सलग तिसरी चाचणी निगेटिव्ह आल्याने त्यांनी नेटमध्ये सराव केला. गेल्या आठवड्यात दीपक आणि ऋतुराज या दोन खेळाडूंसह १३ जणांना कोरोनाची लागण झाली होती. त्यामुळे संपूर्ण संघाचा विलगीकरण कालावधी वाढवण्यात आला होता.

गुरुवारी या सर्व खेळाडूंची एक अतिरिक्त कोरोना चाचणी घेण्यात आली होती. शुक्रवारी सकाळी अहवाल आला आणि चेन्नई संघाच्या सरावाचा मार्ग मोकळा झाला. सीएसकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी काशी विश्वानाथन म्हणाले,‘ त्या १३ खेळाडूंना वगळता बाकी सर्वांची कोरोना चाचणी तिसऱ्यांदा निगेटिव्ह आली.’

टॅग्स :आयपीएल 2020बीसीसीआय