मुंबई - ‘कॅप्टन कूल’ महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखालील चेन्नई सुपरकिंग्ज आणि अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाखालील राजस्थान रॉयल्स या दोन संघांच्या पुनरागमनासहित शनिवारपासून इंडियन प्रीमियर लीगच्या (आयपीएल) ११व्या सत्राची धमाकेदार सुरुवात होत आहे. शनिवारी मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर दिमाखदार उद्घाटन सोहळा झाल्यानंतर गतविजेत्या मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपरकिंग्ज यांच्यात सलामीचा सामना रंगणार असून, क्रिकेटप्रेमींमध्ये या सामन्याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.
स्पॉट फिक्सिंगप्रकरणी बंदीच्या कारवाईला सामोरे गेल्यानंतर
चेन्नई आणि राजस्थान संघांचे पुनरागमन होत आहे. मात्र असे असले तरी त्यांच्या पाठीराख्यांचा उत्साह जराही कमी झालेला नाही. विशेष म्हणजे धोनीला पुन्हा एकदा पिवळ्या जर्सीमध्ये पाहून चेन्नई समर्थकांमध्ये मोठा उत्साह पाहण्यास मिळत
आहे. संघाच्या सराव सत्रासाठीही चेपॉक स्टेडियमवर झालेली चाहत्यांची मोठी गर्दी चर्चेचा विषय ठरत आहे. त्याचवेळी, राजस्थानची धुरा अजिंक्यच्या खांद्यावर असली, तरी प्रशिक्षक शेन वॉर्नकडून
त्यांना विशेष अपेक्षा आहेत. आयपीएलच्या पहिल्या सत्रात वॉर्नच्या नेतृत्वातच राजस्थानने सर्वांना मागे टाकत जेतेपद उंचावले होते. त्यामुळे आता १० वर्षांनंतर पुन्हा एकदा वॉर्नकडून राजस्थानला याच कामगिरीच्या पुनरावृत्तीची अपेक्षा आहे.
दुसरीकडे, तीन वेळा स्पर्धेच्या अंतिम फेरीत पोहोचूनही जेतेपदाने हुलकावणी दिलेल्या रॉयल चॅलेंजर्स बँगलोर संघाचा कर्णधार विराट कोहलीने यंदा जेतेपद पटकावण्याचा निर्धार केला आहे. त्याने नुकताच, ‘जेतेपद पटकावण्यासाठी चाहत्यांपेक्षा मी खूप उत्सुक आहे,’ अशी प्रतिक्रिया देत आपला निर्धार स्पष्ट केला आहे. कोहलीसह एबी डिव्हिलियर्सच्या समावेशामुळे आरसीबीची फलंदाजी भक्कम असून, यंदा त्यांची गोलंदाजीही जबरदस्त मजबूत आहे.
स्टार्सची कमतरता...
या शानदार स्पर्धेची उत्सुकता शिगेला पोहोचली असतानाच काही स्टार खेळाडूंची कमतरताही यंदा भासेल. दक्षिण आफ्रिकेत घडलेले चेंडू छेडछाड प्रकरण आणि दुखापतीमुळे चार शानदार खेळाडू यंदा लीगमध्ये दिसणार नाहीत. मिशेल स्टार्क आणि कागिसो रबाडा दुखापतीमुळे, तर स्टीव्ह स्मिथ आणि डेव्हिड वॉर्नर चेंडू छेडछाड प्रकरणात अडकल्यानंतर एका वर्षाच्या बंदीला सामोरे जात आहेत.
बॉलीवूड तडका...
वानखेडे स्टेडियमवर होणाऱ्या सलामीच्या सामन्याआधी संध्याकाळी ६ वाजता आयपीएलच्या शानदार उद्घाटन सोहळ्याला सुरुवात होईल. या वेळी बॉलीवूडचे
अनेक स्टार्स आपली कला सादर करणार असल्याने हा सोहळा आणखी रंगतदार होईल.
या वेळी बॉलीवूड स्टार हृतिक रोशन, वरुण धवन, जॅकलीन फर्नांडिस आणि डान्सिंग लिजंड प्रभू देवा यांच्या धमाकेदार सादरीकरणावर सर्व जण ठेका धरतील. सुमारे दीड तास रंगणारा हा सोहळा ७.१५ वाजता समाप्त होईल; आणि त्यानंतर १५ मिनिटांनी सलामीच्या सामन्यासाठी नाणेफेक होईल.
Web Title: IPL: T-20 cricket explosions to begin today
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.