लंडन - क्रिकेट विश्वचषक जिंकल्यानंतर इंग्लंडचा संघ प्रथमच मैदानात उतरणार असून, इंग्लंड आणि आयर्लंड यांच्यातील एकमेव चारदिवसीय कसोटी सामन्याला आजपासून लॉर्ड्सवर सुरुवात होणार आहे. अॅशेस मालिकापूर्वी एकमात्र कसोटी सामना इंग्लंड आयर्लंडविरुद्ध खेळणार आहे. विशेष म्हणजे कसोटी पदार्पण केल्यानंतरचा आयर्लंडचा संघ पहिल्यांदाच लॉर्ड्सवर खेळणार आहे.
गेल्या वर्षी आयर्लंडने कसोटी क्रिकेटमध्ये पाकिस्तानविरुद्ध पदार्पण केले होते. परंतु या सामन्यात आयर्लंडला पराभवाचा सामना करावा लागला होता. मात्र आता विश्वचषक उंचावणाऱ्या इंग्लंडला लॉर्ड्सवरच पराभूत करून ऐतिहासिक विजय मिळवण्यासाठी आयर्लंडचे खेळाडू उत्सुक आहेत.
इंग्लंड संघ जो रूटच्या नेतृत्वाखाली हा सामना खेळणार आहे. इंग्लंडने बेन स्टोक्स आणि जोस बटलर यांना विश्रांती दिली असून, मोईन अली, जॉनी बेअरस्टो, जेसन रॉय हे फलंदाजीची धुरा सांभाळतील. तसेच इंग्लडचा वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसन पोटरीच्या दुखापतीमुळे आयर्लंडविरुद्धच्या सामन्याला मुकणार असल्यामुळे ख्रिस वोक्स, स्टुअर्ट ब्रॉड यांच्यावर अतिरिक्त भार असेल. आयर्लंडची मदार प्रामुख्याने कर्णधार विल्यम्स पोर्टरफिल्ड, केव्हिन ओ’ब्राएन, पॉल स्टर्लिग या खेळाडूंवर असणार आहे.