Ishan Kishan Asia Cup 2022: भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) २७ ऑगस्टपासून सुरू होणाऱ्या आशिया कप 2022 साठी १५ सदस्यीय संघाची घोषणा केली. विशेष म्हणजे यष्टीरक्षक-फलंदाज इशान किशनला संघात स्थान मिळालेले नाही. इशानसोबतच केरळचा यष्टिरक्षक संजू सॅमसन यालाही आगामी स्पर्धेसाठी संघात स्थान मिळालेले नाही. त्यानंतर इशान किशनने आशिया चषक संघात निवड न झाल्याने रॅपर 'बेला'च्या काही ओळी शेअर करत आपली व्यथा मांडली आहे.
ईशान किशनने इंस्टाग्राम स्टोरीवर लिहिले की, 'आता पुन्हा असं घडू द्यायचं नाही, जखमी झालास तरी चालेल... तुम्हाला कोणी मूर्ख समजत असलं तरी तुम्ही 'आग' होऊन पुढे जात राहा... बेला, मागे राहिलास तरी चालेल, संयम ठेवायला शिक.. या सगळ्या घाईगर्दीत गायब होऊन जाऊ नकोस' अशा आशयाची एक इन्स्टा स्टोरी त्याने पोस्ट केली आहे.
दरम्यान, रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील या संघात युवा फलंदाज इशान किशन, व्यंकटेश अय्यर, यष्टिरक्षक संजू सॅमसन, ऋतुराज गायकवाड यांना स्थान मिळालेले नाही. याशिवाय अष्टपैलू शार्दुल ठाकूर, फिरकी गोलंदाज कुलदीप यादव, वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज, उमरान मलिक यांनाही संघात समाविष्ट करण्यात आलेले नाही. त्यामुळे आजच्या संघाच्या घोषणेनंतर अनेक खेळाडूंचे मोठ्या स्पर्धेत भारताकडून खेळण्याचे स्वप्न भंगल्याचे दिसत आहे.
आशिया कपसाठी भारतीय संघ- रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, दीपक हुडा, ऋषभ पंत (विकेटकीपर), दिनेश कार्तिक (विकेटकीपर), हार्दिक पंड्या, आर जडेजा, आर अश्विन, वाय चहल, आर बिश्नोई, भुवनेश्वर कुमार, अर्शदीप सिंग, आवेश खान | स्टँड बाय खेळाडू- श्रेयस अय्यर, अक्षर पटेल आणि दीपक चहर
२७ ऑगस्टपासून दुबईत आशिया कपला सुरुवात होणार आहे. या स्पर्धेत ६ संघ खेळणार आहेत. भारतीय संघ २८ ऑगस्टला पाकिस्तान विरुद्ध पहिला सामना खेळणार आहे. रोहितच्या नेतृत्वाखालील टीम इंडिया अ गटात आहे.