घरच्या मैदानावर श्रीलंका ( ट्वेंटी-20) आणि ऑस्ट्रेलिया ( वन डे ) यांना पराभवाची चव चाखवल्यानंतर टीम इंडिया 2020 मधील पहिल्या परदेश दौऱ्यासाठी रवाना झाली आहे. भारतीय संघानं नववर्षातील पहिल्या ट्वेंटी-20 सामन्यांत श्रीलंकेवर 2-0 असा, तर ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वन डे मालिकेत 2-1 असा विजय मिळवला. भारतीय खेळपट्टींवर वर्चस्व गाजवल्यानंतर टीम इंडिया आणखी तगड्या आव्हानाचा सामना करण्यासाठी न्यूझीलंड दौऱ्यावर रवाना झाली आहे. पण, या दौऱ्यापूर्वी टीम इंडियाला मोठा धक्का बसला आहे. सलामीवीर शिखर धवननं खांद्याच्या दुखापतीमुळे मर्यादित षटकांच्या सामन्यांच्या मालिकेतून माघार घेतली आहे. त्यात आणखी एका खेळाडूची भर पडली आहे.
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेतील दुसऱ्या वन डे सामन्यात भारताचा सलामीवीर शिखर धवनला दुखापत झाली होती. त्यात तिसऱ्या सामन्यात अधिक भर पडली आणि त्यानं मैदान सोडलं होतं. त्यानंतर तो फलंदाजीलाही आला नाही. त्याच्या अनुपस्थितीत लोकेश राहुल आणि रोहित शर्मा यांनी ओपनिंग केली होती. त्यामुळे धवनच्या न्यूझीलंड दौऱ्यावरही साशंकता होती. अखेर धवनला किवी दौऱ्यातून माघार घ्यावी लागली आहे. टीम इंडियासोबत धनव ऑकलंडला रवाना झाला नाही. धवननंतर आता भारताचा जलदगती गोलंदाज इशांत शर्माही न्यूझीलंड दौऱ्यावर जाणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे.
रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेत दिल्लीकडून खेळताना इशांत शर्मा दुखापतग्रस्त झाला होता. दुखापतीनंतर डॉक्टरांच्या मदतीने इशांत मैदान सोडावे लागले होते. पण, त्याच्या घोट्याला झालेली दुखापत गंभीर असल्याचे निदर्शनास आले आहे आणि त्यामुळे तो कसोटी मालिकेत सहभागी होणार नसल्याचे मंगळवारी स्पष्ट करण्यात आले. बीसीसीआयनं न्यूझीलंड दौऱ्यासाठी केवळ ट्वेंटी-20 संघ जाहीर केला आहे. त्यामुळे आता दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेत कोणाची वर्णी लागते हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.