कोलंबो : या महिन्यात भारतीय संघ श्रीलंकेमध्ये मर्यादित षटकांच्या सामन्यांची मालिका खेळेल. या दौऱ्यासाठी भारताने आपला दुसऱ्या श्रेणीचा संघ पाठवला असून, या संघाचे नेतृत्व शिखर धवन याच्याकडे सोपविण्यात आले आहे. मात्र, श्रीलंकेचा माजी विश्वविजेता कर्णधार अर्जुन रणतुंगा याने मात्र यावर नाराजी व्यक्त करताना श्रीलंका क्रिकेट बोर्डवर टीका केली. त्याने म्हटले की, ‘भारताच्या दुसऱ्या श्रेणीच्या संघाचे यजमानपद भूषविणे अपमानास्पद आहे.’
भारत आणि श्रीलंका यांच्यात १३ जुलैपासून तीन एकदिवसीय आणि तीन टी-२० सामन्यांची मालिका खेळवली जाणार आहे. विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील मुख्य भारतीय संघ सध्या इंग्लंड दौऱ्यावर असल्याने श्रीलंका दौऱ्यासाठी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) धवनच्या नेतृत्वात कमी अनुभव असलेल्या खेळाडूंचा संघ पाठविला आहे. या संघात सहा खेळाडू असे आहेत, ज्यांनी एकही आंतरराष्ट्रीय सामना खेळलेला नाही. माजी कर्णधार आणि राष्ट्रीय क्रिकेट अकादमीचा (एनसीए) विद्यमान अध्यक्ष राहुल द्रविड याचे मार्गदर्शन भारतीय संघाला लाभणार आहे.
विद्यमान प्रशासन यासाठी दोषी n याबाबत रणतुंगा यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना म्हटले की, ‘दौऱ्यावर येणारा संघ भारताचा दुसऱ्या श्रेणीचा संघ आहे आणि त्यांचे येथे येणे आपल्या क्रिकेटचा अपमान आहे. टीव्ही मार्केटिंगच्या गरजा पूर्ण करण्याच्या उद्देशाने त्यांच्याशी खेळण्यास तयार होणाऱ्या विद्यमान प्रशासनाला मी यासाठी दोषी मानतो. n भारताने आपला सर्वोत्तम संघ इंग्लंडला पाठविला असून, कमजोर संघ येथे पाठविला आहे. यासाठी मी बोर्डाला दोष देईन.’ भारतीय संघ सध्या श्रीलंकेत असून, भारतीयांनी आपला विलगीकरणाचा कालावधी पूर्ण केला आहे. १३ जुलैला मालिकेतील पहिला एकदिवसीय सामना खेळविण्यात येईल.