नवी दिल्ली : भारत-इंग्लंड मालिकेला ५ फेब्रुवारीपासून सुरुवात होत आहे. भारताला त्यांच्या मैदानावर पराभूत करणे किती कठीण असते हे इंग्लंडला चांगले ठाऊक आहे. इंग्लंडचे माजी प्रशिक्षक व झिम्बाब्वेचे माजी खेळाडू ॲण्डी फ्लॉवर यांनी ही बाब मान्य केली. टीम इंडियाला हरविणे इंग्लंडला कठीण जाणार असल्याचे त्यांचे मत आहे.
फ्लॉवर यांनी ॲलिस्टर कूक याचे २०१२च्या भारत दौऱ्याचे उदाहरण देत ज्यो रुट यानेही कूकचे अनुकरण करण्याचा सल्ला दिला. कूक मैदानावर भक्कमपणे उभा राहायचा. त्यावेळी भारत मायदेशात पराभूत झाला होता. रुटनेही असेच पाय रोवायला हवेत. आगामी कसोटी मालिका पाहुण्या संघासाठी फार कठीण असल्याचे भाकीत फ्लॉवर यांनी वर्तविले आहे. फ्लॉवर म्हणाले, ‘मोठ्या धावसंख्येसाठी जोस बटलर व बेन स्टोक्स यांच्याकडून मोठ्या खेळीची अपेक्षा आहे.’
अँडरसन, ब्रॉड, स्टोक्स ठरतील निर्णायक‘कुठल्या संघाचे पारडे जड असेल हे सांगणे कठीण आहे. इंग्लंडकडे दमदार खेळाडूंचे संयोजन असल्याने विजयासाठी खेळावे लागेल. कर्णधार ज्यो रुट, वेगवान गोलंदाज जेम्स ॲन्डरसन आणि स्टुअर्ट ब्रॉड तसेच अष्टपैलू बेन स्टोक्स यांनी योग्यवेळी कामगिरी करायला हवी. काही गोष्टी सामन्याच्या दिवशी काय घडेल, यावर विसंबून असतील. महत्त्वाच्या क्षणी संधीचे सोने करणारा संघ बाजी मारतो. मागच्या एका दशकात इंग्लंडच्या यशाचे श्रेय ॲन्डरसन-ब्रॉड यांना जाते. दोघांनी मिळून ११०० कसोटी बळी घेतले आहेत. दोघांच्या निवृत्तीनंतर पोकळी भरून काढणे कठीण होईल,’असे मत ॲण्डी फ्लॉवर यांनी व्यक्त केले.